महाराष्ट्र
Trending

सप्तश्रृंगी गडाच्या 81 कोटी 86 लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

कळवण-सुरगाणा तालुक्यातील 494 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

नाशिक, दि. 7 :: कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी गडाच्या विकासासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या 81 कोटी 86 लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास शासनस्तरावर मंजूरी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज कळवण येथे कळवण व सुरगाणा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मंचावर विधासभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितिन पवार, हिरामण खोसकर, डॉ. रावसाहेब शिंदे, कळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे, नगराध्यक्ष कौतिक पगार, माजी जि.प. अध्यक्ष जयश्री पवार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी व पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या 81 कोटी 86 लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत मंजूरी देण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून योजनांची अमंजबजावणी शासनस्तरावर करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी शुन्य टक्के व्याजदराने 3 लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला- विविध विकास कामांवरील असलेली स्थगितीही शिथिल झाली असून येणाऱ्या काळात प्रस्तावित विकासकामांनाही मंजूरी देण्यात येवून आर्थिक तरतूद केली जाईल. शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देवून कळवण तालुक्यातील ओतूर धरणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजूरी देण्यात येणार असून हा प्रश्न निकाली निघणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने शुन्य टक्के व्याजदराने 3 लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस उर्जितावस्थेसाठी शासनस्तरावर तोडगा काढला जाईल. परंतु यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते कळवण व सुरगाणा तालुक्यातील 494 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. चणकापूर धरण परिसरात माजी मंत्री स्वर्गीय ए.टी. पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटन स्थळाच्या धर्तीवर आदिवासी जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सुरगाणा व कळवण तालुक्यात पर्यटनास चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचा विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येईल.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या अश्वासनाचे स्वागत आहे. कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासींच्या विकास कामे, वनपट्टे प्रश्न यावर सकारात्मक भूमिका शासनस्तरावर घेण्यात यावी अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी आमदार नितिन पवार यांनी आपल्या मनोगतात कळवण व सुरगाणा तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली तसेच भविष्यात करावयाच्या कामांना शासनस्तरावर मंजूरी देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Back to top button
error: Content is protected !!