औरंगाबाद शहरात रिक्षासह १३ बेवारस गाड्या जप्त, अनधिकृत पोस्टर, बॅनर्स व टपऱ्या हटवल्या ! महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग अॅक्शन मोडवर !!
जी 20 परिषदेनिमित्त प्रशासकांच्या आदेशानुसार कारवाई

संभाजीनगर लाईव्ह, दि.२२ फेब्रुवारी – महानगरपालिका यांत्रिकी विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या वतीने आज दि २२ फेब्रुवारी रोजी शहरातील नेहरू भवन जामा मस्जिद परिसरातील आणि इतर ठिकाणाहून एकूण १३ बेवारस चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. तसेच विविध भागातून बॅनर पोस्टर ,लोखंडी टपरी आणि गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
शहरात होणाऱ्या जी 20 परिषदे निमित्त प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार आज शहरातील विविध भागातून रस्त्यावरच्या टपऱ्या काढण्यात आल्या. यात प्रमुख्याने झोन क्रमांक एक ते नऊ या परिसरात रस्त्यावर बेवारस वाहने बंद पडलेले आणि भंगार अवस्थेतील चार चाकी एकूण 13 गाड्या जप्त करण्यात आल्या. अदालत रोड समोरील दहा बाय 11 ची रसवंती आणि दोन टपऱ्या काढण्यात आल्या.
मिल कॉर्नर येथील एक लहान टपरी तर सिडको बस स्टॅन्ड परिसरातील हॉटेल रस्त्यावरील सहा लोखंडी टपऱ्या आणि एक हातगाडी या ठिकाणाहून जप्त करण्यात आली. याशिवाय अनधिकृत ६९ झेंडे, बॅनर, पोस्टर जप्त करण्यात आले. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून अतिक्रमणधारकांनी आपली वाहने, तसेच रस्त्यावर असलेले अतिक्रमणे काढून घ्यावे असे आवाहन प्रशासक डॉ अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांनी केले आहे.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
आज करण्यात आलेली कारवाई प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम व कार्यकारी अभियंता यांत्रिकी डी के पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली निर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, उप अभियंता अमोल कुलकर्णी, इमारत निरीक्षक आर एम सुरासे, सय्यद जमशेद ,पंडित गवळी सागर श्रेष्ठ, पोलीस पथक यांनी कारवाई सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.