राजकारण
Trending

शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह खरेदी करण्यासाठी 2000 कोटींचा सौदा ! संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप !!

मुंबई, दि. १९ – शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण खरेदी करण्यासाठी 2000 कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा खळबळजनक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केला. या खोके सरकारला जनताच त्यांची जागा दाखवणार, असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह खरेदी करण्यासाठी 2000 कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज, रविरावरी सकाळी केला. राऊत यांनी ट्विटमध्ये दावा केला आहे की 2,000 कोटी रुपये हा प्राथमिक आकडा आहे आणि तो 100 टक्के खरा आहे. सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या एका बिल्डरने ही माहिती मला दिल्याचेही राऊत यांनी सांगितले. या दाव्याचे समर्थन करणारे पुरावेही लवकरच उघड करणार असल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केला.

हे सरकार खोके देवून सत्तेवर आले आहे. शिवसेना संपवण्यासाठी केंद्रापर्यंत दलाल कार्यरत असल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केला. दरम्यान, निवडणूक आयोगाने शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना मानून ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह देण्याचे आदेश दिलेले आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले, अशी जळजळीत प्रतिक्रियाही उद्धव ठाकरे यांनी कालच पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर लगेच दुसर्या दिवशी म्हणजे आज १९ फेब्रुवारी रोजी संजय राऊत यांनी विरोधकांवर आरोप करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेचे नाव विकत घेण्यासाठी 2000 कोटी रुपये ही छोटी रक्कम नाही, असेही राऊत म्हणले.

Back to top button
error: Content is protected !!