महाराष्ट्र
Trending

प्रति ब्रास 600 रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित ! साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे वाळूची विक्री करण्याचे निर्देश !!

जिल्हा प्रशासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करावी महसूल-मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

Story Highlights
  • महसूल मंत्र्यांचा जिल्हाधिकारी-अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

मुंबई, दि. 29 : सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा प्रशासनाने करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले.

महसूल मंत्री विखे यांनी व्हीडीओ कॉनफरन्सिंगद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री विखे म्हणाले की, राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती/वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर केले आहे. हे धोरण राबवितान असताना जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना अडचणी येऊ शकतात. यासाठी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या पाठिशी जिल्हाधिकारी यांनी ठामपणे उभे रहावे.

वाळू उत्खनन व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्तीं नष्ट करणे याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे सांगून विखे म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेल्या रेती/वाळू धोरणानुसार रेतीचे/ वाळूचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाळू/ रेतीचे सर्वंकष धोरण असावे याबाबतची मागणी होती. या नवीन धोरणामुळे सर्वसामान्यांना वाळू/रेती सोप्या पध्दतीने खरेदी करता येणार आहे. शिवाय अनधिकृत पध्दतीने होणारे रेती/वाळूचे उत्खनन यावर आळा बसणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत रेती/ वाळू उपलब्ध व्हावी, वाळूची अवैध वाहतूक रोखली जावी यावर राज्य शासनाने भर दिला आहे.

पूर परिस्थिती धोका कमी करणे, नदीपात्रातील दिशा सरळ करणे कामी आवश्यक असलेली रेती /वाळू नदीपात्रातून काढणे यासाठी जलसंपदा विभागाची मदत घेऊन अशी कामे प्राधान्याने करणेबाबत निर्देश दिले. वैयक्तिक घर बांधकामासाठी ठराविक प्रमाणात वाळू उपलब्ध करून देणे,नवीन वाळू धोरण करताना सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी, नागरिकांना कमीत कमी दरात वाळू उपलब्ध देण्याचा शासनाचा मानस आहे.मुबलक वाळू पुरवठा उपलब्ध केल्यास त्याचा सर्व सामान्यांना लाभ मिळणे, हा शासनाचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रति ब्रास 600रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित- या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येण्यास मदत होणार आहे. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच 600 रुपयात वाळू उपलब्ध होणार आहे. या धोरणानुसार स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इत्यादी खर्च देखील आकारण्यात येतील. वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथूनच या रेतीची विक्री करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती- नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याची कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, भू-विज्ञान व खनिकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील.

वाळू गट निश्चित करतील- ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेईल. विकास कामांसाठी वाळू उपलब्ध करण्याबरोबरच आजुबाजूच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू नये, म्हणून वाळूचे उत्खनन केले जाते. राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा बसणार आहे, असेही मंत्री विखे यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!