रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरणाऱ्या कोयता गँगला मोक्का लावा, तडीपार करा, कोणत्याही परिस्थितीत दहशत मोडून काढा: अजितदादा सभागृहात कडाडले
- 'कोयता गँग'मधला अल्पवयीन मुलांचा समावेश गंभीर मुद्दा,पुणे शहर व परिसरातील 'कोयता गँग'च्या गुंडांची दहशत रोखा
- राज्याला 'कोयता गँग'च्या दहशतीतून मुक्त करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची विधानसभेत मागणी
नागपूर दि. २० डिसेंबर – पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारखे हिंसक कारवाया करते, राज्यातल्या अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत. कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.
विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
पुणे शहर व आसपासच्या उपनगरात ‘कोयता गँग’ची दहशत आहे. पुणे परिसरातल्या मांजरी बुद्रुक, भेकराईनगर, गंगानगर, मुंढवा रस्ता, हडपसर भागात कोयता गॅगच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यातल्या अनेक शहरात व उपनगरात हीच परिस्थिती आहे. कोयता गँगचे लोण इतर शहरातही वाढत आहे.
या गँगकडून रस्त्यावर कोयते परजत दहशत निर्माण केली जात आहे. दहशतीच्या जोरावर ‘कोयता गँग’चे गुंड वर्चस्व निर्माण करत आहेत. कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश हा सुद्धा गंभीर मुद्दा आहे. हे तरुण रात्री-अपरात्री रस्त्यावर हवेत कोयते परजत फिरतात. चोऱ्या करतात.
महिलांचे दागिने लुटतात, ज्येष्ठ नागरीकांना लुटतात, हॉटेलमध्ये जेवण करुन बीलाचे पैसे न देता हॉटेल चालकांना मारहाण करतात, गाड्यांच्या काचा फोडतात. असे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे राज्यात भितीचे वातावरण आहे असेही अजित पवार म्हणाले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe