शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणार्या आ.विक्रम काळे यांना पुन्हा संधी द्या: आ.सतीश चव्हाण
गंगापूर– आमदार विक्रम काळे यांच्यासोबत मी सन 2008 पासून विधी मंडळात काम करत आहे. शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने ते सभागृहात मांडत असतात. सरकार आपले असो की विरोधी पक्षाचे असो शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणार्या आ.विक्रम काळे यांना पुन्हा विधी मंडळात काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केले.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 30 जानेवारी 2023 रोजी होत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ आज गंगापूर व वैजापूर येथे आ.सतीश चव्हाण यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयात आयोजित जाहीर सभेत बोलताना आ.सतीश चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही शासनस्तरावर जोमाने पाठपूरावा सुरू केला. मात्र कोरोनासारख्या नव्या संकटाला सरकारला सामोरे जावे लागले. मात्र अशाही परिस्थितीत 23 जून 2022 रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासकडे आम्ही शाळा अनुदान, जुनी पेन्शन, शिक्षक-प्राध्यापक भरती यासारख्या महत्वाच्या प्रश्नांसाठी बैठक घेतली.
त्यामध्ये शाळा अनुदान व जुन्या पेन्शनचा प्रस्ताव सम्यक समितीच्या अहवालासह मंत्रीमंडळासमोर आणा, सरकार निर्णय घेईल असे निर्देश अजितदादा पवार यांनी दिले होते. परंतु काही दिवसांमध्ये आपणास अनपेक्षीत सत्ता बदलाला सामोरे जावे लागले. आघाडी सरकार असताना शाळा, वर्गतुकड्या व कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढला, विनाअनुदान शाळांची संच मान्यता व वैयक्तिक मान्यता सुरू केली,
मोफत पाठ्यपुस्तक व शालेय पोषण आहार योजना लागु करून घेतली, सहावा व सातवा वेतन आयोग लागु केला, विद्यार्थी पटसंख्या 20 व 25 वर केली, शिक्षण सेवकांचे नाव बदलुन सहाय्यक शिक्षक करून घेतले, वाढत्या महागाईमुळे त्यांचे मानधन दुप्पट करून घेतले, महिला शिक्षकांच्या प्रसुति रजेमध्ये वाढ करून घेतली, कनिष्ठ महाविद्यालयीन व एम.सी.व्ही.सी. शिक्षकांचा अनेक वर्षांपासूनचा जिव्हाळ्याचा पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडवून घेतला,
प्राध्यापक भरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षण लागु करून घेतले, तासिक तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनामध्ये वाढ करून घेतली असे कितीतरी प्रश्न आ.विक्रम काळे व आम्ही शासनदरबारी पाठपूरावा करून सोडवून घेतले. सभागृहात शिक्षकांचे प्रश्न मांडत असताना आ.विक‘म काळे यांना मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर सभात्याग करण्याची भूमिका देखील त्यांनी अनेक वेळा घेतली. शिक्षकांचे अनेक प्रश्न आज शासन दरबारी प्रलंबित आहेत याची आम्हाला जाणीव आहे. हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आ. विक्रम काळे यांना प्रथम पसंतीचे मत देवून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी माजी आमदार लक्ष्मणराव मनाळ, माजी आमदार श्री.अण्णासाहेब माने, शिवाजीराव बनकर, कृष्णा पाटील डोणगावकर, ज्ञानेश्वर नीळ, संजय जाधव, सुधीर माने, एकबाल सिद्दीकी, वश्वजीत चव्हाण, प्रशांत मरकड, सचिन विधाते तर वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात झालेल्या जाहीर सभेप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आ.कैलास पाटील, तालुकाध्यक्ष ऍड.प्रताप निंबाळकर, माजी सभापती अविनाश पाटील गलांडे, पंकज ठोंबरे, ज्ञानेश्वर घोडके, उल्हास ठोंबरे, दिलीप बनकर, मजिद कुरेशी, गणेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe