औरंगाबाद जिल्ह्यातील ७५ जणांची फसवणूक करून अडीच कोटींची माया जमवली ! गंगापूर-वैजापूर शिवारात ६० एकर शेती घेणाऱ्या महाठकाला बंगळूरुतून अटक !!
महाराष्ट्रातील ठाणे, नवी मुंबई व बुलढाणा येथे अशाच प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल
- मौजे सिध्दनाथ वाडगांव शिवारातील शेतजमीन अभिरक्षित करण्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून त्यामध्ये सक्षम प्राधाकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, वैजापूर यांची नियुक्ती केली आहे.
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – उर्दू वर्तमानपत्रात जाहिराती, आकर्षक माहिती पत्रक आणि हॉटेलमध्ये सेमिनार घेवून गुंतवणुकदारांना आकर्षक व दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले. जिल्ह्यातील जवळपास 70 ते 75 लोकांची 2 कोटी 22 लाख रूपायांची आर्थिक फसवणुक करून मौजे सिध्दनाथ वाडगांव (जि. औरंगाबाद) शिवारात ६० एकर शेतीही खरेदी केली. सन-2017 ते 2019 या दरम्यान सुरु असलेली कंपनी नंतर बंद करून पोबारा केलेल्या महाठकास औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बंगळुरुतून मुसक्या आवळल्या. दरम्यान, मौजे सिध्दनाथ वाडगांव शिवारातील शेतजमीन अभिरक्षित करण्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून त्यामध्ये सक्षम प्राधाकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, वैजापूर यांची नियुक्ती केली आहे.
औरंगाबाद सिटीचौक पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल आहे. करोडो रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी रिदास इंडिया कंपनीचा डायरेक्टर मोहम्म्मद अनिस आयमन यास अटक करण्यात आली आहे. त्यास बंगळुरू, कर्नाटक राज्यातून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास दिनांक 07/02/2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात ठाणे, नवी मुंबई व बुलढाणा येथे अशाच प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
यासंदर्भात औरंगाबाद शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अविनाश आघाव यांनी संभाजीनगर लाईव्हला दिलेली माहिती अशी की, दिनांक 13/12/2019 रोजी मोहम्मद रफी मोहम्मद ताहेर शेख (रा. सादत नगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली की, रिदास इंडिया कंपनी बँगलोर ही नोंदणीकृत कंपनी आहे. कंपनीचे डायरेक्टर मोहम्मद आयुब हुसैन, मोहम्मद अनिस आयमन (दोघे रा. बँगलोर) यांनी सन-2017 ते 2019 दरम्यान जुना बाजार रोड, औरंगाबाद येथे कंपनीचे कार्यालय स्थापन केले. उर्दू वर्तमानपत्रात जाहिरात दिली. याशिवाय आकर्षक माहिती पत्रक तयार केले. हॉटेलमध्ये सेमिनार घेवून गुंतवणुकदारांना आकर्षक व दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले. औरंगाबाद जिल्हयातील सर्वसामान्य गरीब लोकांकडून कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करून घेतली. कंपनीने सुरूवातीस काही दिवस परतावा रक्कम दिली. कंपनीने सन 2019 नंतर गुंतवणुकदारांना मुळ रक्कम व परतावा रक्कम परत न देता कंपनीने परस्पर कार्यालय बंद करून औरंगाबाद जिल्हयातील जवळपास 70 ते 75 लोकांची 2 कोटी 22 लाख रुपायांची आर्थिक फसवणुक केली. या आशयाची फिर्याद पोलीस ठाणे सिटीचौक येथे दाखल केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयाची व्याप्ती व स्वरूप पाहता तपास आर्थिक गुन्हे शाखा मार्फतीने करण्यात येत आहे.
सदर गुन्हयाच्या तपासात तपासिक अंमलदार यांनी तत्काळ आरोपीतांच्या मालमत्तेचा शोध घेतला. आरोपीतांनी गुंतवणुकदारांच्या पैशातून स्वतःच्या नावे मौजे सिध्दनाथ वडगांव (जि. औरंगाबाद) येथे स्वतःच्या नावे 60 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती तपासात प्राप्त झाली. सदर जमिनीचे मालकी हक्काचे दस्तएवेज हस्तगत करून MPID कायद्याप्रमाणे जमीन अभिरक्षित करण्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी औरंगाबाद व अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हा शाखा कार्यालय, मुंबई यांच्या मार्फतीने शासनास सादर केला होता. प्रस्तावाच्या अनुषंगाने गृह विभाग महाराष्ट्र शासन यांनी प्रस्ताव मान्य करून अधिसूचना जारी केलेली आहे. त्यामध्ये सक्षम प्राधाकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, वैजापूर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळण्याकरिता आशा पल्लवीत झालेल्या आहेत.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून आरोपीतांचा वेळोवेळी शोध घेतला परंतु आरोपी चाणाक्ष असून त्याने वेळोवेळी राहण्याचे ठिकाण बदलून, स्वतःचे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी बंद केल्यामुळे आरोपी मिळुन आले नाहीत. त्यानंतर तपासिक अंमलदार तृप्ती तोटावार सपोनि, आर्थिक गुन्हे शाखा व टिमने आरोपीच्या संपर्कातील मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक पध्दतीने विश्लेषण करून बँगलोर गाठले. आरोपीच्या संपर्कातील व्यक्तींचा स्थानिक पोलिसांच्या मदतीने कसोशीने व कौशल्याने शोध घेवून रिदास इंडिया कंपनीचा डायरेक्टर फरार आरोपी मोहम्मद अनिस आयमन (रा. बँगलोर) यास बँगलोर येथून ताब्यात घेवून अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता दिनांक 07/02/2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रिदास इंडिया कंपनीविरूध्द महाराष्ट्रात ठाणे, नवी मुंबई व बुलढाणा येथे अशाच प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दादाराव सिनगारे, तपासी अधिकारी सहा. पोलीस निरिक्षक तृप्ती तोटावार, पोना विठ्ठल मानकापे, पोअं संदीप जाधव, पोअं बाबा भानुसे आर्थिक गुन्हे शाखा यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe