सात बायका आणि बिल्डरची फजिती ऐका ! महिलेने बांधकाम व्यावसायिकाची गचांडी पकडली व मुलींना छेडतो का ? असे म्हणत कारमध्ये कोंबले, सोलापूरमध्ये अपहरण नाट्य रंगले, पहा पुढे काय झाले ?
सोलापूर, दि. ९ – अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल असे अपहरण नाट्य सोलापुरात समोर आले. सात महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्याची फजीती ऐका.. एका महिलेने बांधकाम व्यावसायिकाची गचांडी पकडली व मुलींना छेडतो का ? असे म्हणत कारमध्ये कोंबले. दोन महिला त्याच्या उजव्या बाजूला तर दोन महिला त्याच्या डाव्या बाजूला बसल्या. त्यानंतर त्या बांधकाम व्यावसायिकाला घेऊन कार सुसाट निघाली. दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाच्या मित्रासमोरच हा प्रकार घडल्याने त्याने त्या कारचा पाठलाग सुरु केला. काही अंतरावर जाऊन बांधकाम व्यावसायिकाच्या मित्राने त्या कारच्या पुढे त्याची मोटारसायकल आडवी लावली. यामुळे कार थांबली. आणि अपहरणाचे हे नाट्य फसले. दरम्यान, हे अपहण या महिलांनी कशासाठी केले, याची चौकशी पोलिस करत आहेत. नागेश प्रॉपर्टी बिल्डींग, सात रस्ता, सोलापूर परिसरातून सुरु झालेल्या या अपहरण नाट्यावर रंगभवन येथून पुढे बेगम पेठ पोलीस चौकीजवळ पडदा पडला.
आकाश नामदेव काळे (वय 30 वर्षे, व्यवसाय बांधकाम व्यवसाय, रा. 635, दक्षिण कसबा, गोदावरी डेअरी शेजारी, चौपाड, सोलापूर) असे त्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. ते स्वत: पी.डब्ल्यू.डी. कडून छोटे-मोठे बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतात. तसेच खाजगी बांधकाम व्यवसायही करतात.
बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दि. 08/02/2023 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे व त्याचा मित्र धर्मण्णा धुळाप्पा गोरे (वय 32 वर्षे, रा. घर नं. 552, शुक्रवार पेठ, सोलापूर) ऍक्टीव्हाने (क्र. MH 13 CD 9897) मित्र अमृत सिध्दप्पा हाताळे यांच्या गाळा नं. 5, तळमजला, नागेश प्रॉपर्टी बिल्डींग, सात रस्ता, सोलापूर येथील ऑफीसमध्ये पोहोचले. अमृत हाताळे हा होम लोन एजंट म्हणून बँकेकडे काम करतो. अमृत हाताळे यांना बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांचा मित्र धर्मण्णा गोरे याने होम लोन मंजुरीकरिता प्रकरण दिलेले आहे.
सदर प्रकरणाबाबत चौकशी करून बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे व त्यांचा मित्र धर्मण्णा गोरे, अमृत हाताळे, विनोद गायकवाड हे बिल्डींगच्या पार्किंगमध्ये मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी आले. धर्मण्णा गोरे याने मोटार सायकल चालू केली व बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे हे मोटार सायकलवर पाठीमागे बसले. तसेच अमृत हाताळे व विनोद गायकवाड यांनी त्यांची मोटार सायकल घेतली.
ते सर्व पार्किंगमधून बाहेर पडून साधारण 12:50 वाजता रोडजवळ आले असता तेथे सात अनोळखी महिला त्यांच्या मोटार सायकल समोर आल्या. त्यांनी मोटार सायकल अडवली. त्यातील एका महिलेने बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांची गचांडी पकडली व मुलींना छेडतो का ? असे म्हणत बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांचा छातीजवळ शर्ट पकडला व सर्व महिलांनी मिळून मला हातांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे हे त्यांना, काय झाले ते सांगा असे विचारत होते.
त्यांनी बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांना मारत मारत गणेश चैबर बिल्डींग समोर नेले. तेथे अगोदरच एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार चालु स्थितीत उभी होती. चालक सिटवर एक अनोळखी व्यक्ती बसलेला होता. सदर महिलांनी कारचा दरवाजा उघडून पाठीमागील सिटवर मध्यभागी बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांना जबदरस्तीने बसवले. बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांच्या उजव्या बाजुस दोन महिला व डाव्या बाजुस दोन महिला बसल्या.
तसेच समोरील सिटवर ड्रायव्हरच्या बाजुस दोन महिला बसल्या. कारमध्ये जागा अपुरी असल्याने सदर महिला एकमेकींच्या मांडीवर बसल्या. ड्रायव्हरने कार वेगाने रंगभवनच्या दिशेने घेतली. दरम्यान, बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांनी कारमध्ये महिलांना काय झाले आहे ? मला कोठे घेवून जात आहात ? का मारत आहात ? असे विचारले. यावर महिलांनी शिवीगाळ करून हाताने मारहाण तोंडांवर, पाठीवर मारहाण करुन गप्प बसण्यास सांगितले.
एका महिलेने बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांच्या पॅन्टच्या खिशातून ओपो रेनो 7 कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट काढून घेतला. रंगभवन येथून पुढे बेगम पेठ पोलीस चौकीजवळ कार आल्यावर बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांचा मित्र अमृत हाताळे व विनोद गायकवाड यांनी त्यांची मोटार सायकल कारच्या समोर आडवी लावली. त्यामुळे कार थांबली. त्याच वेळी बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांचा मित्र धर्मण्णा गोरे हा मोटार सायकलवर तेथे आलेला दिसला.
त्याने कार बंद करून चावी काढून घेतली. कारमधील महिलांनी बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांना कारमध्येच बसवून ठेवले. तेथे सातवी अनोळखी महिला पाठीमागून कारजवळ आली. तेथे रस्त्याने जाणारे-येणारे लोकांची गर्दी जमली. थोडयाच वेळात तेथे पोलीस आले. पोलीसांनी बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांना कारमधून खाली उतरवले. तेथून पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांना बेगम पेठ पोलीस चौकीमध्ये नेले. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांना तसेच सात महिला व कारचा चालक यांना सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये आणले.
सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर कार चालकाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव – अजय मोहन वाघमारे (वय 25 वर्षे, व्यवसाय चालक, रा. तळजाई माथा वसाहत, नवग्रह मंदिर, – गल्ली नं. 78, पद्मावती, पुणे) असे सांगितले. तसेच त्या सातही महिला पुण्याच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आकाश नामदेव काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये काल चालक अजय मोहन वाघमारे याच्यासह पुण्याच्या सात महिलांवर भारतीय दंड संहिता १८६० कलम ३२३, ३६४ A, ३६७, ३९५, मोटार अधिनियम १९५४ कलम ६६, १९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe