जालन्यात मध्यरात्री गुंडागर्दी, सलून चालकासह मित्राला चाकूने भोसकले ! दोघे जखमी, चाकू हल्ला सीसीटीव्हीत कैद !!
जालना, दि. १- जालना शहरात मध्यरात्री गुंडागर्दीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. लग्न समारंभ आटोपून घरी निघालेल्या सलून चालकावर चाकु हल्ला करण्यात आला. त्याच्या बचावासाठी आलेल्या मित्रावरही त्यांनी वार केला. यात दोघे जण जखमी झाले. दरम्यान, टवाळखोर मोटारसायकल तेथेच सोडून पळाले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास संतोष सुपारकर यांच्या शिवांश डेअरी समोर कचेरी रोड जुना जालना येथे ही घटना घडली.
राहील अब्दुल पठाण (20 वर्षे रा. जफर खान चाळ), शेख नविद रफिक (20 वर्षे रा. गवंडी मस्जिद जवळ जालना), शेख सोफियान शेख उस्मान अशी आरोपींची नावे आहेत. दोन अल्पवयीन मुलेही आहेत. दरम्यान, याप्रकरणी कदिम जालना पोलिस स्टेशनमध्ये कलम – 307,326,324, 323, 504, 143, 146, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप जगन्नाथराव लिंगायत (वय 32 वर्षे व्यवसाय सलून दुकान रा. कचेरी रोड सिध्देश्वर महादेव मंदिराच्या पाठीमागे जुना जालना) असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर नवजीवन हॉस्पिटल जालना आयसीयु वार्डमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, त्यांचे कचेरी रोड येथे सँडी हेअर स्पा सलून नावाचे दुकान आहे. दिनांक 28/02/2023 रोजी 00.30 वाजेच्या सुमारास गवळी मोहल्ला पंचायत वाडा जुना जालना येथील लग्न समारंभातून संदीप जगन्नाथराव लिंगायत हे एक्टीव्हा स्कूटीवरून घराकडे कचेरी रोडने येत असताना संतोष सुपारकर यांचे शिवांश डेअरी समोर चार ते पाच अनोळखी दोन मोटारसायकली रस्त्यावर उभ्या करून बाजूच्या नालीमध्ये काहीतरी शोधत होते.
म्हणून संदीप जगन्नाथराव लिंगायत यांनी त्यांना विचारले की, तुम्ही नालीमध्ये काय शोधत आहात त्यावर ते संदीप जगन्नाथराव लिंगायत यांना म्हणाले की, आमचा मोबाईल नालीनध्ये पडला आहे म्हणून मोटारसायकलच्या लाईटच्या उजेडात मोबाईल शोधण्यासाठी मदत करीत आहे. त्यातील एकजण म्हणाला की, मोबाईल नाही आमचा घाव नालीमध्ये पडला आहे त्यानंतर त्यातील एकाने हातामध्ये प्लास्टिक पिशवी घालून नालीमध्ये घाव शोधू लागला. त्यावेळी ते सर्वजण एकमेकांना जोरजोराने शिवीगाळ करू लागले. म्हणून संदीप जगन्नाथराव लिंगायत हे त्यांना म्हणालो की, येथे माझे घर असल्याने तुम्ही शिवीगाळ करू नका.
त्यावर एकजण म्हणाला की, कहा है तेरा घर असे बोलून शिवीगाळ करू लागला. तेव्हा संदीप जगन्नाथराव लिंगायत यांनी त्याच्या मित्राला फोन करून कळविले की, तू लवकर इकडे ये काही लोकांसोबत किरकिर झाली आहे. त्यावर मित्र ओंकार लाड व त्याचे सोबत अक्षय गवळी (रा. नाशिक) हे दोघे मोटारसायकलवर आले. त्यावेळी त्या ठिकाणी संदीप जगन्नाथराव लिंगायत यांच्याशी काही जण झटापट करीत होते. त्यावेळी ओंकार लाड व अक्षय गवळी हे सोडवासोडव करीत असतांना त्यांच्यापैकी एकाने त्याच्या हातातील चाकूने अक्षयच्या डाव्या कानाच्या पाठीमागे मारून जखमी केले व संदीप जगन्नाथराव लिंगायत यांच्यावरही चाकूने डाव्या बाजूस बरगडी जवळ मारून जखमी केले. मारहाण करून ते स्प्लेन्डर मोटारसायकल जागेवर सोडून पायी शनिमंदिरच्या दिशेने पळून गेले.
दोघे एन्टीव्हा गाडीवर निघून गेले. त्यानंतर संदीप जगन्नाथराव लिंगायत, अक्षय गवळी यांना मित्रांनी दीपक हॉस्पिटल जालना येथे घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून बजाज हॉस्पिटल औरंगाबाद येथे रेफर केले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाके देणारा सर्जन नाही तुम्ही दुसर्या दवाखान्यात जा असे म्हणाल्याने नवजीवन हॉस्पिटल जालना येथे उपचार कामी दाखल करण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe