सिडकोत विविध ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई, हॉटेल सुरभी रेस्टॉरंट पार्किंग जागेवर दोन दिवसांत कारवाईचा अल्टीमेटम !
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभाग मार्फत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको हडको भागांत सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई अंतर्गत आज एन ८ बजरंग चौक ते बळीराम पाटील मुख्य रस्त्यावरील हॉटेल सुरभीचे मालक भोसले यांनी पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम करून ३० बाय ४० चे दोन मोठे हॉल तयार केले असून या ठिकाणी फिटनेस जिम टाकण्यात आले होते. तसेच इतर पार्किंगच्या जागेत सायंकाळच्या वेळेस टेबल खुर्च्या लावून हॉटेलच्या व्यवसाय करीत असल्याने अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांनी पथका समवेत पाहणी करून पार्किंगची जागा मोकळी करण्यासाठी आदेशीत केले आहे. जिमचे मौल्यवान सामान आणि इतर काचेच्या वस्तू असल्याने त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सुरभी हॉटेलचे मालक भोसले यांनी स्वतः दोन दिवसात अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा महापालिका या ठिकाणी कारवाई करेल असे समक्ष सांगितले आहे.
तसेच आज टी व्ही सेंटर हडको येथील संजय गांधी भाजी मार्केटमधील खुल्या जागेतील तीन दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले.
या तिन्ही दुकानदारांनी दहा बाय दहा व दहा बाय पंधरा व पंधरा बाय पंधरा या आकाराच्या खुल्या मार्केटच्या जागेमध्ये विटा सिमेंटचे कच्चे पक्के बांधकाम करून पत्र्याचे शेड ठोकले होते. या अतिक्रमण धारकांनी त्यांना जशी मार्किंग देण्यात आली होती त्याप्रमाणे त्यांनी स्वतः आपले अतिक्रमण आणि बांधकाम काढून घेतले.
याच परिसरातील राजकीय पक्षाच्या नागरिकांनी आपले जास्तीचे अतिक्रमण बांधकाम स्वतः काढून घेतले. संजय गांधी भाजी मार्केट खुल्या जागेतील व रस्त्यावरील केलेले बांधकाम चे अतिक्रमण उद्या काढण्यात येणार आहे. नागरिकांना आज मार्किंग करून देण्यात आली आहे. तसेच अपेक्स हॉस्पिटल लगत एकूण सहा टपऱ्या काढण्यात आल्या. टीव्ही सेंटर पोलीस चौकीच्या पाठीमागे पार्किंगच्या जागेतील कच्चे पक्के बांधकाम काढण्यात आले आहे.
सदर अतिक्रमण काढल्याने भाजी मार्केटमध्ये जाण्यासाठी आता रस्ता मोकळा झाला आहे. सर्व व्यापारी बंधूंनी उच्च न्यायालय व महानगरपालिका, सिडको प्रशासन यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहे. एन सिक्स अविष्कार चौक येथे एका पाणीपुरी आणि सँडविच विक्रेत्याने फुटपाथ वर दुकान लावून पाच बाय पाच च्या ओटा तयार केला होता सदर गाडी जप्त करून ओटा पूर्णपणे निष्काशीत करण्यात आला आहे.
ही कारवाई प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे ,पोलीस निरीक्षक फईम हाश्मी, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे, सिडको विभागाचे मिलन खिल्लारे, मनपा नगर रचना विभागाच्या पूजा भोगे आदींनी कारवाई भाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागातर्फे देण्यात आली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe