परवानाधारक खत पुरवठादार दुकानाची तपासणी करण्याचे निर्देश ! दोषी कंपन्या विरोधात कायदेशीर कारवाई करा !
खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय
- जिल्हा कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक
संभाजीनगर लाईव्ह दि. 29 -: जिल्ह्यात खरिप हंगामासाठी अवश्यक खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचे वितरण व विक्री सुयोग्य पद्धतीने व्हावे यासाठी कृषि विभाग, वितरक आणि संबंधित यंत्रणाने सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागाच्या निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी वर्षभरातील पीक, खते, बियाणे याचे नियोजन जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालय समितीने सादर केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रकाश देशमुख, महाबीजचे क्षेत्र अधिकारी एस. खान, कृषि विकास अधिकारी प्रकाश पाटील, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी जगन्नाथ तायडे यांच्यासह विविध बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी तसेच खताचे वितरक या बैठकीस उपस्थित होते.
यावर्षीच्या पीकामध्ये सोयाबीन, कापूस व इतर तृणधान्य पीकाच्या बियाणांचा आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध आहे. दुबार पेरणीच्या आवश्यकता पडल्यास बियाण्याची कमतरता पडणार नाही असे नियोजन करुन देशी वाणाचे बियाणे वापरावर शेतकऱ्यांनी भर देण्यासाठी जाणिव जागृती व मार्गदर्शन करावे, अशा सूचना पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.
खताची ऑनलाईन विक्री प्रत्यक्ष मागणीनुसार होते की नाही याबाबत खातरजमा करावी. तसेच नॅनो युरिया वापराबाबत आवाहन करुन शेतकऱ्यांना तो वापराबाबतचे प्रात्याक्षिके करुन दाखवावीत. परवानाधारक खत पुरवठादार तसेच बोगस बियाण्याच्या विक्रीस प्रतिबंधासाठी दुकानाची तपासणी करावी. दोषी कंपन्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
तालुकानिहाय शेतकऱ्यांना बियाण्याविषयी तक्रार निवारण कक्षातून योग्य मार्गदर्शन करण्यात येणार असून पीकावर किटकनाशके फवारणी करतेवेळी सुरक्षिततेच्या उपाययोजना अंमलात आणण्याबाबत मार्गदर्शन करावे. युरिया, डीएपी खताचा बफर साठा वाढण्याबरोबरच पीक वीमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याबाबतच्या त्रृटीची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी पीक विमा कंपनीस दिले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याबाबत तालुकास्तरावरुन परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे देखील त्यांनी संबंधितांना यावेळी सूचित केले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe