महाराष्ट्र
Trending

तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटल्याने खळबळ ! नाशिकमध्ये वैजापूरमधील संशयिताला पोलिसांनी पकडले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८- सध्या सुरु असलेल्या तलाठी भरती ऑनलाईन परीक्षा वादाच्या भोवर्यात सापडली असून राज्यातील नाशिकसह अन्य जिल्ह्यात पेपर फुटल्याच्या संशयाने एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये सुरु असलेल्या या ऑनलाईन परीक्षेदरम्यान वैजापूरच्या एका संशयिताला पोलिसांनी पकडल्याने परीक्षा प्रक्रियावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, वनविभागाच्या परीक्षांमध्येही अशाच प्रकारच्या कॉप्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखलही करण्यात आला आहे. आता अशाच पद्धतीने तलाठीच्या भरतीमधील ऑनलाईन परीक्षेत कॉपीचा हा मोबाईल पॅटर्न समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकमधील वेब एजी इन्फोटेक या परीक्षा केंद्राजवळ ही ऑनलाईन परीक्षा सुरु होती. या परीक्षावर सुरुवातीपासूनच वादळ उठले होते त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. या परीक्षा केंद्राच्या आवारात पोलिस तपासणी करत असताना त्यांना एक जण संशयितरित्या फिरताना आढळला. त्याने हेडफोन लावलेला होता त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याला हटकले व त्याची चौकशी सुरु करून झडती घेतली. त्याच्या मोबाईमध्ये प्रश्नपत्रीकेसंदर्भातील चित्रण मिळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

गणेश शामसिंग गुसिंग असे त्या संशयित युवकाचे नाव आहे. तो अतिशय आधुनिक पद्धतीने परीक्षार्थींना कॉपी पुरवत होता. पोलिस त्याच्याकडून आणखी माहिती घेत आहे. दरम्यान, मोबाईलवरून अतिशय आधुनिक पद्धतीने कॉपीच्या प्रकाराने पोलिसांसह परीक्षा विभाग चक्रावून गेला आहे. नाशिकसह राज्याच्या अन्य भागातही असा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे जे विद्यार्थी रात्र न् दिवस अभ्यास करून परीक्षांना सामोरे जात असताना अशा पद्धतीने कॉपीचा प्रकार समोर आल्याने अभ्यासू विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय ठरू शकतो. यामुळे परीक्षा विभागाने पोलिसांच्या मदतीने कॉपीमुक्त परीक्षा धोरण राबवण्याची गरज आहे.

पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर- आमदार रोहित पवार

तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या. नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुलंमुली मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात, परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफुटी होते आणि या सर्व युवा वर्गाच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं जातं. वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर अधिवेशनात आवाज उठवला असता गृहमंत्री महोदयांनी पेपर फुटल्याचा बातम्या खोट्या असल्याचं सांगत राज्याची दिशाभूल केली होती. गृहमंत्री महोदयांनी तेंव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर आता पेपर फुटले नसते. युवांच्या प्रश्नांवर शासन दुर्लक्ष करणार असेल तर नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हा युवा वर्ग seriuous झाला तर सरकारला खूप महाग पडेल. त्यामुळं पेपरफुटी होणार नाही याकडं शासनाने लक्ष द्यावं, अशी विनंतीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!