खरिपाचे पीक वाचवण्यासाठी जायकवाडी आणि नांदूर मधमेश्वर जलद कालवा प्रकल्पातून पाणी सोडण्याचे निर्देश !
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शिफारस, पालकमंत्री यांनी दिले निर्देश
- खरिपासाठी पाण्याच्या दोन आवर्तनांचे नियोजन करा-समितीची शिफारस
- खरिपाचे पीक वाचवण्यासाठी पाणी सोडा- पालकमंत्री भुमरे
संभाजीनगर लाईव्ह, दि. 26 – पावसाची स्थिती पाहता विभागातील नांदूर मधमेश्वर जलद कालवा प्रकल्पामधून सध्या उपलब्ध पाणीसाठ्यातून खरिप हंगामासाठी दोन आवर्तने देण्याचे नियोजन करावे. तसेच जायकवाडी प्रकल्पातूनही आवर्तन देण्यात यावे, अशी शिफारस आज कालवा सल्लागार समितीने केली. पावसाच्या उर्वरित कालावधीत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहून पुढील आवर्तनांचा निर्णय घ्यावा, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आज कालवा सल्लागार समितीची बैठक खरीप हंगाम 2023 साठी पार पडली. बैठकीत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले की, पुरेशा पावसाअभावी खरीपाचा हंगाम अडचणीत आला असतांना पीक वाचवण्यासाठी त्वरीत पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सिंचन भवनातील सर विश्वेश्वरैय्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस आ. राजेश टोपे, आ. प्रशांत बंब तसेच मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे, अधीक्षक अभियंता महेंद्र आमळे, कार्यकारी अभियंता म.सु. जोशी, कार्यकारी अभियंता जालना सु.भि. कोरडे, कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प बीड श्रीमती रुपाली ठोंबरे, अपर जिल्हाधिकारी बीड डॉ.त्रिगुण कुलकर्णी तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
मराठवाडा विभागातील जायकवाडी व नांदूर मधमेश्वर जलद कालवा प्रकल्प या दोन प्रकल्पांतून पाटबंधारे विभागामार्फत कालव्यांद्वारे होणाऱ्या सिंचनाची माहिती देण्यात आली.
दि.1 सप्टेंबरपासून पाण्याची आवर्तने देण्याचे नियोजन करा- आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पुरेसा पाणीसाठी उपलब्ध असतांना खरिपाच्या पिकांसाठी पाण्याची आवर्तने देण्यात यावी, अशी भूमिका पालकमंत्री भुमरे, आ. बंब व आ. टोपे यांनी मांडली. त्यासाठी दि.1 सप्टेंबर पासून नियोजन करावे. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, यापद्धतीने आवर्तन असावे. खरीपाची पिके तरी हातात आली पाहिजे; यादृष्टीने पाटबंधारे विभागाने नियोजन करावे, अशी सुचना त्यांनी मांडली.
दोन आवर्तने देण्याचे नियोजन करा- पालकमंत्री अद्याप पावसाळ्याचा दीड महिना कालावधी शिल्लक आहे. पावसाने ओढ दिल्याने खरिपाचे पिके धोक्यात आली आहेत. ती हातातून जाऊ नये म्हणून नांदूर मधमेश्वर जलद कालवा प्रकल्पातून दोन आवर्तने देण्याचे नियोजन करावे. पहिले आवर्तन तातडीने द्यावे व पावसाची स्थिती पाहून पुढील आवर्तनाचे नियोजन करावे, असेही पालकमंत्री भुमरे यांनी सांगितले. तसेच जायकवाडी प्रकल्पातुनही आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याचे नियोजन करावे,असेही त्यांनी सांगितले.
पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सर्व्हेक्षण करा- पाटबंधारे विभागामार्फत ज्या पाटचाऱ्या, वितरिका, कालव्यांमधून पाणी सोडले जाते त्यांचे सर्व्हेक्षण करावे. हे सर्व्हेक्षण पाणीवापर संस्थांच्या सोबत प्रत्यक्ष पाहणी करुन करावे. त्यानंतर दुरुस्तीकामांचे अंदाजपत्रक तयार करुन निधी मागणीचा प्रस्ताव द्यावा,असे निर्देशही पालकमंत्री भुमरे यांनी दिले.
जिल्ह्यासाठीचे पाणी वितरणाचे नियोजन हे स्थानिक पातळीवर व्हावे, अशी सुचना आ. बंब यांनी मांडली तर आ. टोपे यांनी पाण्याच्या अनिर्बंध वापरावर नियंत्रण असावे, अशी सूचना मांडली.
नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प- याप्रकल्पाचा एकूण जलसाठी 409.71 दलघमी असून त्यातील उपयुक्त जलसाठी 386.10 दलघमी इतका आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पात मुकणे (214.16 दलघमी), भावली (44.75 दलघमी), भाम (75.01 दलघमी) आणि वाकी (75.8 दलघमी) अशा चार धरणांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे लाभक्षेत्र अहमदनगर जिल्ह्यात 1562 हेक्टर तर औरंगाबाद जिल्ह्यात 42 हजार 298 हेक्टर इतके आहे. जिल्ह्यातील गंगापूर व वैजापूर तालुक्यात प्रामुख्याने सिंचन लाभ दिला जातो. या प्रकल्पातुन खरीप हंगामासाठी 98.29 दलघमी पाणी वापराची तरतूद आहे. तर सद्यस्थितीत या प्रकल्पात 246.33 इतका अनुज्ञेय उपयुक्त पाणीसाठा आहे, अशी माहिती देण्यात आली.
जायकवाडी प्रकल्प- हा प्रकल्प मराठवाड्यातील महत्त्वाचा प्रकल्प असून त्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांचे लाभ क्षेत्र आहे. या प्रकल्पाचा एकूण जलसाठी 2909 द्लघमी असून उपयुक्त जलसाठी 2171 दलघमी आहे. सद्यस्थितीत दि.25 ऑगस्ट 2023 पर्यंत या प्रकल्पात एकूण उपयुक्त साठा क्षमतेच्या 33.56 टक्के पाणी उपलब्ध आहे, अशीही माहिती देण्यात आली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe