छत्रपती संभाजीनगरझेडपी
Trending

बैल पोळ्यावर बंदी, बैलांना गोठ्याच्या बाहेर काढून एकत्रित जमवल्यास होणार कारवाई ! लम्पीच्या पार्श्वभूमीवर आदेश, ग्रामसेवकांवर दिली मोठी जबाबदारी, वाचा सविस्तर आदेश !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने सावधगीरीचे पाऊल उचलत बैल पोळ्यानिमित्त बैलांना एकत्रित जमण्यास बंधी घातली आहे. शेतक-यांनी / पशुपालकांनी आपल्या गोठ्यातच फवारणी करून, निर्जंतुकीकरण करून जनावरांना हळद, तेल, करंज तेल, निबोळी तेल, कापूर आदी आयुर्वेदिक साहित्य वापरून खांदेमळणी करावी, असे आवाहन झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशाद्वारे केले आहे. याशिवाय यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांच्यामार्फत शेतक-यांचे प्रबोधन करावे असेही आदेशित करण्यात आले आहे. यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामसेवकांवर आता मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सर्व पंचायत समितींच्या गट विकास अधिकारी यांनी लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने “बैलपोळा सण साजरा करणे बाबत पत्रात नमूद निर्देशित केले आहे की, जिल्ह्यात सद्यस्थितीत जनवरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असून जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात जनावरे आजारी आहेत.

सदरील आजार हा संसर्गजन्य असल्याने दि. 14/09/2023 रोजी साजरा होणा-या बैलपोळा सनानिमित्त जनावरे एकत्रित येण्याची व सदरील आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थीतीत दि. 14/09/2023 रोजी बैलपोळ्यानिमित्त जनावरे गावात एकत्रित आणण्यावर या पत्राद्वारे बंदी घालण्यात येत आहे. जर जनावरे एकत्रित आणले आणि संसर्ग वाढला तर ग्रामपंचायतीस संदर्भ क्र. 4 च्या परिपत्रकान्वये संबंधीतावर कार्यवाही करण्याचा अधिकार राहील याची नोंद घ्यावी.

शेतक-यांनी / पशुपालकांनी आपल्या गोठ्यातच फवारणी करून, निर्जंतुकीकरण करून जनावरांना हळद, तेल, करंज तेल, निबोळी तेल, कापूर आदी आयुर्वेदिक साहित्य वापरून खांदेमळणी करावी, असे आवाहनही या आदेशाद्वारे करण्यात आले आहे.

बैलांना / जनावरांना कोणत्याही परिस्थीतीत वरनिश, कलर, ऑईल पेंट आदी रासायनिक पदार्थ लावण्यात येऊ नयेत, ज्यामुळे बैलांच्या त्वचेला इजा पोहचेल अथवा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सदर दिवशी शेतकरी राजाचा मोठा सन असल्यामुळे केवळ मिरवणुकीमुळे किंवा जनावरांच्या एकत्रित जमावामुळे लंपी चर्मरोगाची बाधा होते. ती होऊ नये याकरीता गोठ्यातच सर्वतोपरी पूजा व इतर विधी करून बैलपोळा सन साजरा करावा असे आवाहन आपण आपल्या तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांच्यामार्फत शेतक-यांना करावे, असेही आदेश देण्यात आले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!