गरोदर महिला व बाळ मरणाच्या दारात असताना उपचारासाठी डॉक्टर व नर्स उपलब्ध करून दिले नाही ! दोघींनी उपचाराअभावी जीव सोडला, डॉक्टर शामराव वाकोडेंनी मृत महिलेच्या वडीलांना शिवीगाळ करून बाहेर हाकलले !!
हलगर्जीपणामुळे अनेक पेशंटचा मृत्यू, मृत मुलीच्या पित्याच्या तक्रारीवरून अधिष्ठाता शामराव वाकोड यांच्यावर गुन्हा
संभाजीनगर लाईव्ह, दि. ५- गरोदर महिला व बाळ मरणाच्या दारात असताना उपचारासाठी डॉक्टर व नर्स उपलब्ध करून दिले नाही. दोघींनी उपचाराअभावी जीव सोडला. डॉक्टर शामराव वाकोडेंनी मृत महिलेच्या वडीलांना शिवीगाळ करून बाहेर हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात घडला. या आशयाची फिर्याद मृत मुलीच्या पित्याने नांदेड ग्रामीण पोलिसांत दिली आहे. त्यानुसार डॉक्टर शामराव वाकोडे (अधिष्ठाता डॉ. शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामाजी मोहन टोम्पे (वय 40 वर्षे व्यवसाय शेतमजुरी, रा. कुरुळा ता. कंधार जि.नांदेड) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार त्यांना तीन मुले व एक मुलगी असून मुलगी अंजलीचे लग्न झालेले असून अंजलीस मुरंबी ता. लोहा जि.नांदेड येथील मंचक रामदास वाघमारे यांच्यासोबत सन 2021 मध्ये लग्न झाले.
मुलगी अंजली मंचक वाघमारे (वय 21 वर्षे) ही गरोदर असल्याने तिला दिनांक 30/09/2023 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास डिलेव्हरीसाठी सरकारी रुग्णालय विष्णुपुरी, नांदेड येथे दाखल केले. प्रसुती विभाग वार्ड क्रमांक 19 मध्ये तिला दाखल करून घेतले. मुलगी अंजलीची दिनांक 01/10/2023 रोजी रात्री 1.00 वाजेच्या सुमारास नॉर्मल डिलेव्हरी होऊन तिला मुलगी झाली. डिलीव्हरी झाली तेंव्हा अंजली व तिच्या बाळाची तब्यत चांगली असल्याचे तेथील डॉक्टरांनी व स्टाफने सांगितले.
त्यानंतर सकाळ झाल्यानंतर अंजलीचे रक्त जास्त जात आहे. बाळाची तब्यत बिघडली आहे असे डॉक्टारांनी नातेवाईकांना सांगितले व त्यासाठी रक्ताचे व पेशीचे पॉकेट व इतर मेडिकल बाहेरून आणण्यासाठी नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी मेडिकल साहित्य बाहेरून आणून डॉक्टारांना दिले. परंतु त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर हजर नव्हते म्हणुन अंजलीचे वडील कामाजी मोहन टोम्पे हे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव वाकोडे (अधिष्ठाता डॉ. शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड) यांना जाऊन भेटले.
माझ्या मुलीचे व तिच्या बाळाची प्रकृती गंभीर असून रक्त जास्त जात आहे तुम्ही ताबडतोब डॉक्टर पाठवा परंतु अधिष्ठाता डॉक्टर शामराव वाकोडे यांनी अंजलीचे वडील कामाजी टोम्पे यांना जाणूनबुजुन तिथेच बसून ठेवले. बराच वेळ झाल्यानंतरही कोणीही डॉक्टर व नर्स त्यांनी पाठवले नाही. मुलगी व तिचे बाळ मरणाच्या दारात असतानासुद्धा अधिष्ठाता शामराव वाकोडे यांना माहिती असूनसुद्धा त्यांनी औषध न देता व कोणताही डॉक्टर व नर्स उपचारासाठी उपलब्ध करून दिले नाही. अंजलीचे वडील उपचारासंदर्भात वारंवार विचारणा करत असताना अधिष्ठाता शामराव वाकोडे यांनी अंजलीच्या वडिलांना शिवीगाळ करून बाहेर हाकलून दिले. वडिल कामाजी टोम्पे यांना मुलीला व तिच्या बाळाला भेटू दिले नाही. यामध्ये बराच वेळ निघुन गेला. त्यादरम्यान कोणतेही उपचार अंजलीवर व तिच्या बाळावर केले नाहीत.
दिनांक 02/10/2023 रोजी अंजलीच्या बाळाचा (मुलीचा) मृत्यू झाला असे म्हणून सकाळी 6.00 वाजता मरण पावलेले बाळ नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर अंजली ही दिनांक 04/10/2023 रोजी सकाळी 10.30 वाजता मरण पावली म्हणून नातेवाईकांना सांगितले. दिनांक 30/09/2023 रोजी रात्री 08.00 वा. ते दिनांक 04/10/2023 रोजीचे सकाळी 10.30 वा दरम्यान मुलगी अंजलीस सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे डिलीव्हरीसाठी दाखल करून उपचार न करता सरकारी दवाखान्याचे डीन वाकोडे व बाळांचे दवाखान्याचे मुख्य डॉक्टर यांनी जाणीवपूर्वक आपले हाताखालील डॉक्टर व नर्स उपचारासाठी उपलब्ध करून दिले नाही व अत्यावश्यक औषधी उपलब्ध करून दिले नाही.
सर्व औषधी व रक्ताचे पॉकेट बाहेरून आणावयास लावले. त्यामुळे मृत मुलीच्या वडीलाचे जवळपास बाहेरुन आणलेल्या औषधांचा व रक्तांचे पॉकेटचा 45000/- रुपये खर्च झालेला आहे. सरकारी दवाखाना येथुन मुलीवर व तिच्या बाळावर सरकारी दवाखान्यात उपचाराची कोणतीही व्यवस्था केली नाही. सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे मागील चार दिवसांत डीन वाकोडे यांनी जाणूनबुजून पेशंटला डॉक्टर नर्स औषध उपलब्ध करून न दिल्यामुळे उपचाराअभावी बरेच पेशंट मृत्यू पावले आहेत. तरी सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेडचे डीन वाकोडे व बाळांचे दवाखान्याचे मुख्य डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करून न्याय द्यावा, अशी फिर्याद मृत मुलीचे वडील कामाजी मोहन टोम्पे (वय 40 वर्षे व्यवसाय शेतमजुरी, रा. कुरुळा ता. कंधार जि.नांदेड) यांनी नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe