आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदारांचे पैसे तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश, अहवाल सादर करण्याचे आदेश !
- सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील
मुंबई दि. 19 : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी पतसंस्था व आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदार व गुंतवणुकदारांचा परतावा तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.
छत्रपती संभाजी नगर येथील आदर्श नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणेबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री वळसे-पाटील बोलत होते. मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, आदर्श नागरी पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख (SIT) तथा सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) धनंजय पाटील व इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री वळसे – पाटील म्हणाले की, आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणेबाबत सर्व संबंधितांनी तातडीने आवश्यक ती कायर्वाही विहीत वेळेत पूर्ण करावी तसेच आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याकरिता स्थापन केलेल्या विशेष तपास पथक प्रमुख (SIT) तथा सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) धनंजय पाटील यांनी कार्यवाहीबाबतचा अहवाल संबंधितांना तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणार्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील २०० कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ६२ स्थावर मालमत्तांची माहिती घेतली आली असून त्याची रेडिरेकनर दरानुसार किंमत ९० कोटी रुपये आहे. उर्वरीत मालमत्तेची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेचा लीलाव करून त्यातून मिळालेली रक्कम ठेवीदारांना देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याशिवाय आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन मालमत्ता विक्री करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यात पिशोर येथील आदर्श मंगल कार्यालय व नाचनवेल येथील आदर्श सहकारी रुग्णालय विकून ठेविदारांचे पैसे देणार आहे.
असा आहे आदर्शच्या घोटाळ्याचा प्रवास.. आदर्शच्या एकूण ४४ शाखा, आतापर्यंत एकूण १५ आरोपी अटकेत
छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी आदर्श घोटाळा प्रकरणी आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीची मुद्देनिहाय सविस्तर माहिती खासदार इम्तियाज जलील यांना पत्राव्दारे कळवली आहे. पोलीस आयुक्तांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की,
१. सदर गुन्हयात आजपर्यंत आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक व इतर आरोपी एकूण १५ आरोपीतांना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून दोन्ही गुन्हयात तपास करण्यात आला आहे. यात सहनिबंधक कार्यालयाचे सतीष खरे यांचा देखील समावेश आहे.
२. आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिवज्योती कॉलनी एन ६ सिडको, छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे जाळे छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पसरलेले असून एकूण ४४ शाखा आहेत.
३. गुन्हयात गैरव्यवहार / गैरप्रकार झालेल्या कर्ज प्रकरणाच्या मुळ फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पतसंस्थेची तीन वाहने जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तीन आरोपीतांचे घरझडत्या घेवून तसे पंचनामे करण्यात आले आहे. मालमत्तेची माहिती मिळण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला असून ६२ स्थावर मालमत्तांची माहिती घेण्यात आली असून त्याची रेडीरेकनर दरानुसार किंमत ९० कोटी रुपये आहे. उर्वरीत मालमत्तेची माहिती प्राप्त करण्यात येत आहे.
४. सदर गुन्हयात ठेविदारांचे / खातेदारांची रक्कम परत मिळण्याकरीता एमपीआयडी कायदा १९९९ कलम ३ व ४ तसेच सहकलम २१ व २३ अनियंत्रीत जमा योजना प्रतिबंध कायदा २०१९ कायदयाप्रमाणे मालमत्ता संरक्षित करण्यासाठी मालमत्तेची माहिती मिळविण्याचे काम चालु आहे. त्यानंतर रितसर शासनाकडे प्रस्ताव सादर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
यातील नमूद अटक आरोपीताविरुध्द सबळ पुरावे हस्तगत झाल्याने त्यांचे विरुध्द मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र क्रमांक ३८६/२०२३, ३९१/२०२३ दिनांक ११/०९/२०२३ व दिनांक २३/०९/२०२३ अन्वये दाखल करण्यात आले असून सदरचे दोन्ही गुन्ह्याचा बारकाईने तपास करण्यात येत आहे व त्यावर आम्ही जातीने लक्ष ठेवून असल्याचे दिलेल्या पत्रात पोलीस आयुक्तांनी नमूद केले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe