छत्रपती संभाजीनगरराजकारण
Trending

आमदार रमेश बोरनारेंची गाडी अडवली ! मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला, ‘एक मराठा लाख मराठा’च्या दिल्या घोषणा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – मराठा आरक्षणावरून राज्यकर्त्यांवर संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांची गाडी अडवून मराठा युवकांनी मराठा आरक्षण लवकर देण्याची मागणी केली. कन्नड पिशोर नका येथे आमदार बोरनारे यांची गाडी मराठा युवकांनी काही काळ अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील मराठा युवक मतदानावर बहिष्कारासह पुढारी व राजकीय नेत्यांना गावबंदी घालत आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत हजारो गावांत सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांना गावबंदी घातली असून गावच्या वेशीवर तसा बोर्डच लावण्यात आला आहे. जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे.

मराठा आरक्षणावरून मराठा युवक काही ठिकाणी आक्रमक होताना दिसत आहे. यापूर्वी बदनापूरचे भाजपा आमदार कुचे यांनाही अशा प्रकारच्या रोषाला सामोरे जावे लागले. बदनापूर मतदारसंघातील रोहीलागड येथे भूमीपूजनाच्या कार्यक्रमास आलेल्या आमदार नारायण कुचे यांना युवकांनी धारेवर धरले होते. सभागृहात तुम्ही मराठा आरक्षणाची आग्रही मागणी केली असेल तरच आम्ही तुमच्या पाठीशी राहू असा पवित्रा घेतला होता. आक्रमक युवकांचा पवित्रा पाहत आमदार नारायण कुचे यांनी काढता पाय घेतला होता. त्यावेळी युवकांनी हुर्रे केला होता.

दरम्यान, आज शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांची गाडी अडवून मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. यावेळी कन्नड पिशोर नका येथे आमदार बोरनारे यांची गाडी मराठा समन्वयकांनी काही काळअडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटीत (जि. जालना) पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. सकाळी ११ वाजेपासून जरांगे उपोषणाला बसले आहे. राज्यातील मराठा बांधवानी लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करून मराठा आरक्षणाची मागणी करावी, असे आवाहन केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!