महाराष्ट्र
Trending

छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील 10 महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत आराखडा सादर करण्याचे निर्देश ! एकल महिला, विधवांना प्राधान्य देणार !!

-उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. 7 : महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील 10 महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या. या संदर्भांत नागपूर विधानभवन येथे बैठक झाली.

या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

या योजनेचा सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, यामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल देण्याचा प्रस्ताव आहे. चांगल्या इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणाऱ्या कंपन्यांची याबाबत माहिती घ्यावी. महिलांना फायदा होईल अशा प्रकारे प्रस्ताव तयार करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

मंत्री तटकरे यांनी पिंक रिक्षा योजनेमुळे महिलांना होणाऱ्या फायद्याविषयीची माहिती दिली. या योजनेंतर्गत एकूण 5 हजार रिक्षा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये एकल महिला, विधवा, परित्यक्ता यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व कल्याण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्यात येणार आहे.

यावेळी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना सॅनिटरी पॅड पुरवण्याबाबतच्या योजनेविषयीही सविस्तर चर्चा करण्यात आली. या दोन्ही योजनांविषयीचे सविस्तर आराखडे सादर करुन त्यावर पुढील बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेण्याविषयीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!