टॉप न्यूजमहाराष्ट्रशेती व कृषी
Trending

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार !

सन 2023 च्या खरीप हंगाम: अर्थसंकल्पातील घोषणेनंतर कृषी विभागाचा शासन आदेश जारी; कापूस व सोयाबीन मिळून सुमारे 4194 कोटी 68 लाख रुपये अनुदान वितरणास मान्यता

मुंबई, दि. 30 : सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.

सन 2023 मध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. मात्र महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधीच घोषित केला होता. त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती.

या निर्णयाची कृषी विभागाने कृषिमंत्री यांच्या नेतृत्वात तातडीने अंमलबजावणी केली आहे. राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये तर 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपये या प्रमाणे अर्थसहाय्य देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 1548 कोटी 34 लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी 34 लाख रुपये असा एकूण 4192 कोटी 68 लाख रुपये इतक्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

सदर अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टल द्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून, डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!