छत्रपती संभाजीनगर
Trending

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा मुलांना पुरवठा करणारा आरोपी गारखेड्यातून जेरबंद ! छापेमारीत दोन लाखांच्या ४०० बनावट नोटा जप्त, मेडिकल व किराणा दुकानदारांना द्यायचे डुप्लिकेट नोटा !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – मुकुंदवाडी परिसरात ५ मुलांकडून १९ नोटा जप्त केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अॅक्टिव झाले अन् विधीसंघर्ष मुलांच्या माध्यमातून मेडिकल, किराणा दुकानांत या डुप्लिकेट नोटा चालवून त्या बदल्यात खर्या चिल्लर नोटा जमवायच्या गोरखधंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या मुलांना एक अज्ञात मोबाईलधारक ५०० रुपयांच्या बनावट नोटा पुरवायचा. केवळ मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी त्याला शोधून काढले. त्याच्या गारखेडा परिसरातील घरावर छापा टाकून पोलिसांनी ५०० रुपयांच्या ४०० बनावट नोटा जप्त केल्या असून आरोपीला पोलिसांनी अटक केली. यापूर्वी ज्या पाच मुलांना पोलिसांनी पकडले होते त्यातील एक सज्ञान आहे. अशा या दोघांना कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सज्ञान मुलगा देवेंद्र उर्फ भैय्या मोरे व नोटा पुरवठा करणारा राहुल गौतम जावळे (रा. नवनाथनगर गारखेडा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत.  पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्रं. २ कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहर व पोलीस ठाणे मुकुंदवाडी पोलीसांनी सामूहिक कामगिरी करून भारतीय चलनी नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा बाजारात चालविणारी टोळीचा पर्दाफाश करून टोळीतील सदस्यांकडून ५००/- रु दराच्या एकूण ४१९ बनावट नोटा असे २,०९,५००/- जप्त केले.

दि. २७/१०/२०२३ रोजी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ शिलवंत नांदेडकर यांना संजयनगर कमान मुकुंदवाडी भागात काही मुले ५०० रुपयांच्या बनावट नोटा ह्या ख-या नोटा असल्याची बतावणी करून मेडीकल दुकाने, किराणे दुकानावर चालवित आहे. ही खात्रीलायक माहीती मिळाल्याने त्यांनी त्यांच्या कार्यालयाचे पोलीस उप निरीक्षक हरीष खटावकर व पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांना सदर माहीतीची खात्रीकरून कार्यवाहीचे आदेश दिले.

त्यावरुन परिमंडळ – २ कार्यालायचे पोलीस उप निरीक्षक हरीष खटावकर व मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे विशेष पथकाचे पोउपनि घुनावत त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्या भागांत जावून मुलांचा शोध घेतला. संजयनगर मुकुंदवाडी कमानीजवळ व संजयनगर येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ चार अल्पवयीन मुले व १ सज्ञान मुलगा देवेंद्र उर्फ भैय्या मोरे असे पाच मुले ५०० रुपये दराच्या १९ बनावट नोटां बाळगतांना मिळून आले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांना बनावट नोटांचा पुरवठा करणाराचे नाव पत्ता माहित नसून फक्त त्याचा मोबाईल नंबर असल्याची माहिती मुलांनी दिली. याप्रकरणी पोलीस ठाणे मुकुंदवाडी येथे पोलीस अंमलदार गणेश वैराळकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात संजयनगर येथील मुलांकडुन मिळालेल्या मोबाईल क्रमांक धारकाचा आनंदनगर पुंडलिकनगर परिसरात शोध घेतला. बनावट नोटा पुरवठा करणार राहुल गौतम जावळे (रा. नवनाथनगर गारखेडा परिसर) यास या गुन्ह्यात अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात ५०० रुपये दराच्या एकूण ४०० बनावट नोटा मिळून आल्या आहेत. सदर गुन्ह्यातील दोघा सज्ञान आरोपीतांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोउपनि झनकसिंग नरसींग घुनावत हे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ शिलवंत नांदेडकर, सहा. पोलीस आयुक्त, डॉ. रणजीत पाटील उस्मानपुरा विभाग, पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि हरीष खटावकर, पोउपनि झनकसिंग घुनावत, सफौ आम्ले, सफौ नरसिंग पवार, पोह बाबासाहेब कांबळे, पोह प्रकाश गायकवाड, पोना गणेश वैराळकर, पोना विनोद गिरी, पोना सुखदेव जाधव, पोअं समाधान काळे, पोअं अनिल थोरे, पोअं गणेश वाघ, पोअं संदिप वैद्य पोअं गोकुळ खटावकर यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!