महाराष्ट्र
Trending

बीडचा कृषी विभाग राज्याचे मॉडेल करणार, शेतकऱ्यांना बियाणे आणि खते रास्त भावात मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवणार: कृषी आयुक्त सुनील चव्हाण

कृषी महोत्सव पाहण्यासाठी जिल्हावासीयांची अलोट गर्दी; नियोजनबद्ध महोत्सवात मान्यवरांकडून आयोजकांचे कौतुक  

बीड, दि. २५ : बीडच्या कृषी महोत्सवाची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे. या भागात पाण्याचा दुष्काळ असला तरी येथील माणसे पाणीदार आहेत. मराठवाड्यात कृषी व्यवस्थापनाची मजबूत बांधणी करायची आहे. महाराष्ट्र राज्यात बीडचा कृषी विभाग एक मॉडेल म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन कृषी विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.

कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या आयोजित कार्यक्रमात आयुक्त सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी मंचावर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, भाग्यश्री टिळेकर, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी  कृषी आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले की, बियाणे आणि रासायनिक खाते रास्त भावात शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यापुढे बियाणे आणि खते यांच्या बॅगवर लॉट नंबर आणि बॅच नंबर असणार आहे. यामुळे विक्रेता आणि शेतकरी यांच्या व्यवहारामध्ये आणि विश्वासामध्ये पारदर्शकता येईल. शेती औषधे दर्जेदार आणि ते शेतकऱ्यांना वेळेवर मिळवून देण्यासाठीचे शासनाचे धोरण असणार असल्याचे मतही कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.

दरम्यान हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, ऐन पेरणीच्या कालावधीमध्ये पाऊस झाला तर शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती होते. त्यामुळे पेरणीपूर्व म्हणजेच 15 ते 30 मे च्या दरम्यान पाऊस झाला तर तो पेरणीयोग्य पाऊस असतो. किमान 100 मीमी पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवणे फायद्याचे ठरणार आहे. रब्बीची पेरणी घाईत आणि खरीप दमानं ही म्हणच आहे. त्यामुळे योग्य पाऊस झाल्यावरच पिकांचा पेरा केला तरच वाढ आणि उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे.

यावेळी महिला उद्योजक भाग्यश्री टिळेकर यांनी शेतकरी गटाचे आणि शेतकरी कंपनीचे अनुभव सांगत भारतामधील महिला गटाचे यशश्वी केलेले नेटवर्क याची सविस्तर माहिती दिली. तर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यावेळी म्हणाले की, मी कृषी पदवीधर असून पोलीस सेवेत काम करत असतांना आज मला घरी आल्यासारखे वाटत आहे. शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय विकसित करण्यासाठी नवनवीन आधुनिक मार्गाचा अवलंब करण्याची गरज असल्याचे सांगून नियोजनबद्ध कृषी महोत्सवाचे कौतुक केले. दरम्यान कृषी महोत्सव पाहण्यासाठी जिल्हावासीयांची अलोट गर्दी उसळली होती. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक यांचे मान्यवरांकडून अभिनंदनही करण्यात आले.

अतिदुर्मिळ वृक्ष बीजप्रदर्शन आकर्षण

कृषी महोत्सवात सर्पराज्ञी बीजोस्तवाचेआयोजन करण्यात आले ,.या बीजोस्तवात सामान्यपणे आढळणाऱ्या वृक्षापासून  दुर्मिळ ते अतिदुर्मिळ बीजोस्तवात प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळणाऱ्या अतिदुर्मिळ, दुर्मिळ अशा पिवळा पळस ,पांढरा पळस ,शेंद्री, निर्मली, रुद्राक्ष ,गारंबी, काजरा,कौशी,सोनसावर, मासरोहिणी, उंडी,वायवर्ण, तांबडा कुडा, लाल हादगा, कुकेर, रतनगुंज ,ताम्हण, खडशिंगी, गोरखचिंच, पांढरा पांगारा, भुत्याकेसी, मुचकुंद,पांढरा कांचन, हिरवा चाफा आदि २०० प्रजातीच्या वृक्षांच्या बियांचा समावेश आहे. प्रदर्शनात आलेल्या लोकांना सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे निसर्गमित्र प्रकाश उजगरे ,सर्पराज्ञी सोनवणे हे मार्गदर्शन करत आहेत.

बीजोस्तवाचे आकर्षण
सर्पराज्ञी बोजोस्तवामध्ये ठेवण्यात आलेल्या  दुर्मिळ महाकाय वृक्ष गोरखचिंच. कुकेर फळ, महावेल  गारंबीशेंग,  खड्शिंगीच्याशेंगांनी महोत्सवातील लोकांना आकर्षित केले. या फळ आणि शेंगा प्रदर्शनाला आलेली लोक आश्चर्यचकित होऊन प्रथमच पहात होती.

Back to top button
error: Content is protected !!