छत्रपती संभाजीनगर

निवृत्ती वेतनधारकांच्या जीवनप्रमाण दाखल्यांसाठी प्रत्यक्ष उपस्थितीसह ऑनलाईन पद्धतीचाही पर्याय !

छत्रपती संभाजीनगर,दि.७ – जिल्हा कोषागारामार्फत निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या जीवन प्रमाणपत्राबाबत प्रत्यक्ष उपस्थिती द्यावी लागते. तथापि, प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय बायोमेट्रिक पद्धतीनेही जीवन प्रमाण दाखला देण्याची सुविधा कोषागार विभागाने उपलब्ध करून दिली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी आपले जीवनप्रमाणपत्र वेळेत (दि.३० नोव्हेंबर पर्यंत) दाखल करावे, असे आवाहन उपसंचालक (वित्त) तथा वरिष्ठ कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी केले आहे.

प्रत्यक्ष उपस्थित राहून जीवनप्रमाण दाखला- निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांचे खाते असलेल्या बँकेत कोषागार कार्यालयाकडून आद्याक्षरनिहाय यादी पाठविण्यात आली आहे. निवृत्तीवेतन धारकांनी दि. ३० नोव्हेंबर पर्यंत आपले खाते असलेल्या बँकेत प्रत्यक्ष हजर राहून यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याच्या ठसा उमटवावा. तसेच पुन:र्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती ही नोंदवावी. तसेच संबंधिताचा आधार नंबर, पॅन नंबर व मोबाईल नंबर याचीही नोंद करावी.

बायोमेट्रिक पद्धतीने जीवनप्रमाण दाखला- प्रत्यक्ष हजर राहून स्वाक्षरी करण्याच्या पद्धतीशिवाय बायोमॅट्रीक पद्धतीनेही जीवन प्रमाण दाखला सादर करता येणार आहे. त्यासाठी http://Jeevanpranam.gov.in या संकेत स्थळावर दि ३० नोव्हेंबर पर्यंत आपली माहिती अपडेट करावी. ज्यांनी स्वाक्षरी अथवा अंगठा उमटविलेला नसेल अथवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला सादर केला नसेल त्यांचे डिसेंबर महिन्यातील निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही.

८० वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्तीवेतनधारकांनाही कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन- त्याचप्रमाणे ज्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या वयाची ८० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष पूर्ण केली आहेत अशा कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी आपले आधारकार्ड, पॅन कार्ड तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड उपलब्ध नसेल तर जिल्हा शल्य चिकित्सकाचे वयाबाबतचे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी वरिष्ठ कोषागार कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे दि.१५ डिसेंबर २०२३ पूर्वी सादर करावे.

आयकर पात्र निवृत्तीवेतनधारकांकडूनही माहिती मागविली- ज्या निवृत्तीवेतनधारकांचे, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांचे वार्षिक निवृत्तीवेतन ७ लक्ष रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांनी आयकर कपातीबाबत जुनी, नवीन आयकर कपात प्रणाली लागु करण्याबाबतचे घोषणापत्र दि.३१ डिसेंबर २०२३ पूर्वी सादर करावे. जुनी आयकर कपात प्रणालीचा विकल्प दिल्यास बचतीबाबतचे कागदपत्रे घोषणापत्रासोबत जमा करावे. विहित मुदतीत घोषणापत्र, बचतीचे कागदपत्रे या कार्यालयास प्राप्त होणार नाहीत, त्यांचे नियमाप्रमाणे लागू होणारे आयकर माहे नोव्हेंबर २०२३ पासून कपात करण्यात येईल,असे उपसंचालक (वित्त) तथा वरिष्ठ कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी कळविले आहे.

Back to top button
error: Content is protected !!