महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविकांबरोबरच आता यापुढील शिबिरांमध्ये त्यांच्या कुटुंबियांचीही आरोग्य तपासणी करणार !

अंगणवाडीच्या माध्यमातून सुदृढ बालक, सक्षम पिढी घडविण्याचे काम - आदिती तटकरे

मुंबई, दि. २३ :- अंगणवाडी कर्मचारी हे फक्त पोषण आहार देणे व बालकांचे संगोपन करणे एवढेच काम करीत नसून सुदृढ बालक आणि सक्षम पिढी घडविण्याचे काम करीत असतात. यावर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यापुढे होणाऱ्या शिबिरांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश केला जाईल, अशी घोषणा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. राज्यातील प्रत्येक बालक सुदृढ होण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात त्यांना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाहीही तटकरे यांनी यावेळी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत भरती प्रक्रियेव्दारे नवनियुक्त झालेल्या १९ हजार ५७७ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यापैकी मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ अंगणवाडी कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रमात मंत्री तटकरे बोलत होत्या.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, स्माईल फाऊंडेशनच्या संचालक उमा आहुजा व धीरज आहुजा, मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ नवनियुक्त अंगणवाडी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ताराबाई मोडक यांनी अंगणवाडी सेवेचा पाया घातला. त्यांचे कार्य पाहूनच तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशभरात अंगणवाडी संकल्पना सुरू केली. बालकांना शिक्षण देणे व त्यांचे योग्य पोषण करून त्यांचा मानसिक विकास करणे यामध्ये मोलाची कामगिरी अंगणवाडी कर्मचारी बजावत असतात. त्यांच्या हातून एक प्रकारे राष्ट्र उभारण्याचे कामच होत असते. धारावी येथे स्माईल फाउंडेशनचे संस्थापक धीरज अहुजा व उमा आहुजा यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले असून विविध महिला विकासाच्या योजना शासन राबवत आहे. महिला विकास धोरण महिलांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयुक्त अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. सचिव डॉ. यादव यांनी विभागाविषयी माहिती दिली. स्माईल फाऊंडेशनच्या संचालक उमा आहुजा, धीरज आहुजा यांनी धारावी येथे बायजुस (BYJUS Education) तर्फे डिजीटल लर्निंग संदर्भात केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला. यावेळी अंगणवाडी कर्मचारी यांच्या पाल्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!