टॉप न्यूजमहाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविकेला प्रत्येकी फॉर्म मागे 50 रुपये मानधन मिळणार, लाडकी बहीण योजना ! प्रत्येक अंगणवाडी सेविकांचा व्हॉटस्अप ग्रुप तयार करण्याचे निर्देश !!

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, तलाठी, पर्यवेक्षिका, वार्ड अधिकारी या घटकांकडून प्रभावीपणे काम करुन घ्यावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात आज मंत्रालयात मंत्री कु.तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पवार उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, व इतर संबधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महिलापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अंगणावाडी केंद्रात या योजनेचे परिपूर्ण, माहितीचे फलक लावावेत, जेणेकरुन सर्व महिलांना योजनेसंदर्भातील पात्र-अपात्रतेचे निकष समजतील, अशा पद्धतीने नियोजन करुन घ्यावे.

तसेच ऑफलाईन फार्म भरुन घेताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेवू नयेत, याबाबतच्या सूचना विभागाकडून देण्यात याव्यात. तालुका गावपातळीवर प्रत्येक अंगणवाडी सेविकांचा व्हॉटस्अप ग्रुप तयार करुन त्या ग्रुपवर या योजनेची सविस्तर माहिती द्यावी. प्रत्येक अंगणवाडी सेविकेला प्रत्येकी फॉर्म मागे 50 रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा पैसे मागण्याचा प्रकार घडणार नाही याची दक्षताही घेण्यात घ्यावी, असेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

गावस्तरावर तसेच तालुकास्तरावर संबंधित घटकांचे सहकार्य घेवून ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन करुन त्या म्हणाल्या की, सकाळी चार तास अंगणवाडी सुरु असते. त्यानंतर एका तासाचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना देण्यात यावे. सर्वांनी एकमेकांच्या समन्वयाने ही योजना यशस्विपणे राबवण्याची सूचना ही यावेळी त्यांनी दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!