महाराष्ट्र
Trending

ग्रामपंचायतच्या सरकारी जागेवर कब्जा करण्यास विरोध केला म्हणून ट्रॅक्टरच्या पट्टीने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण ! बदनापूर तालुक्यातील खडकवाडी गावातील घटना !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२- ग्रामपंचायतच्या सरकारी जागेवर ट्रॅक्टरने वखरून सफाई करून कब्जा करणार्यास विरोध केला म्हणून ट्रॅक्टरच्या पट्टीने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील खडकवाडी गावात घडली. गावातील लोकांनी भांडणाची सोडवा सोडव केली. त्यानंतर जखमीला ज्यावेळी शुद्ध आली त्यावेळी ते जालन्याच्या सरकारी रुग्णालयात होते.

पुनम रामचंद्र बम्हणावत (रा. खडकवाडी ता. बदनापूर जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे.  रायसिंग मगन जगरवाल (वय 67 वर्ष व्यवसाय शेती रा. खडकवाडी ता. बदनापूर जि. जालना) असे जखमीचे नाव आहे. रायसिंग जगरवाल यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 20/09/2023 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी रायसिंग जगरवाल हे गावातील ग्रामपंचायतच्या सरकारी जागेवर होते. त्यावेळी गावातील पुनम रामचंद्र बम्हणावत हे त्यांच्या टॅक्टरने सदरची सरकारी जागा वखरून सफाई करून कब्जा करत होते.

फिर्यादी रायसिंग जगरवाल हे त्यास समजवून सांगत असतांना पुनम बम्हणावत हे फिर्यादी रायसिंग जगरवाल यांना म्हणाले लयच समाज कार्य करायला का, तुला आता दाखवितोच, तुला आता जिंवत सोडत नाही असे म्हणुन त्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरची लोखंडी पट्टी घेऊन त्या पट्टीने फिर्यादी रायसिंग जगरवाल यांच्या कमरेवर मारली.

त्यामुळे फिर्यादी रायसिंग जगरवाल हे खाली पडले. परत त्यांनी सदर पट्टीने डाव्या हातावर मारली. यामुळे मनगटावर मार लागुन गंभीर दुखापत झाली.  भांडणाच्या आवाजाने गावातील लोकांनी सोडवा सोडव केली. नंतर फिर्यादी रायसिंग जगरवाल हे बेशुध्द पडले. दोन-तीन तासांनी शुध्द आली तेव्हा फिर्यादी रायसिंग जगरवाल हे सरकारी दवाखाना जालना येथे होते. हाताला व कमरेला टाके दिलेले होते.

यप्रकरणी रायसिंग मगन जगरवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुनम रामचंद्र बम्हणावत (रा. खडकवाडी ता. बदनापूर जि. जालना) यांच्यावर बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!