समृद्धी महामार्गावरील सावंगी बोगद्याजवळ हवेत गोळीबार करणाऱ्या युवकावर फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तपासासाठी पथक रवाना !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून नुकतेच लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणाची पोलिसांनी तातडीने दखल घेतली. तपासाची सूत्रे फिरवत व्हिडियोमध्ये दिसणार्या युवकावर फुलंब्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासकाणी नेमलेले पथक रवाना झाले आहे. हे ठिकाण सावंगी येथील बोगद्याजवळ असल्याचा व्हायरल व्हिडियोवरून प्राथमिक अंदाज येतो.
बाळु गायकवाड (पूर्ण नाव माहीत नाही) असे त्या युवकाचे नाव असून त्याच्यावर फुलंब्री पोलिस ठाण्यात गुरन 390/2022 कलम 3/25 शस्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच रविवारी मोठ्या थाटा-माटात करण्यात आले. रविवार, ११ डिसेंबरपासून हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे.
लोकार्पणापूर्वी या महामार्गावर अपघातात अनेकांचा बळी गेल्याने हा महामार्ग चर्चेत आला. याच महामार्गावरून बैलगाड्यांचा व्हिडियोही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच चर्चा झाली. दरम्यान, आता या महामार्गावरील बोगद्याजवळ एका युवक काळ्या जीमधून उतरतो. जीपच्या पुढे येऊन हवेत गोळीबार करतो. अगदी चित्रपटाला शोभेल असे या व्हिडियोचे चित्रिकरण करण्यात आले आहे.
यासंदर्भात फुलंब्री पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळु गायकवाड याने काळ्या रंगाची स्कारपिओ क्र.MH20FG2020 ही सम्रुद्धी महामार्गावरील बोगद्या समोर रोडवर गाडी उभी केली. वीना परवाना बेकायदेशीर रित्या गाडीसमोर हातात अग्नीशस्र मधून जिवंत काडतुस फायर करताना दिसून आला. यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास पोनि निकाळजे यांचे आदेशाने पोउपनि धुळे हे करत आहे.
फुलंब्री पोलिस ठाण्याचे पोहेकॉ आनंत ज्ञानोबा पाचंगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. दि.14/12/2022 रोजी 12.30 वाजता सम्रुद्धी महामार्गावरील बोगद्या समोर हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यासंदर्भातील व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होताच दिनांक- 14/12/2022 रोजी 14.32 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि निकाळजे यांनी तत्काळ घटनास्थळास भेट देऊन तपासकामी योग्य त्या सूचना दिल्या. त्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपास कामी पथक नेमून संभाजीनगर व पोलिस स्टेशन हद्दीत रवाना केले आहे.
हा व्हिडियो खरा आहे की रिल करण्यात आली आहे, याचा तपास पोलिस करत आहे. त्या युवकाकडे बंदुकीचा परवाना आहे का ? त्याने हवेत गोळीबार का केला ? ही घटना कधीची आहे ? गोळीबार करण्याचा नेमका हेतू काय होता ? याचा तपास पोलिस करत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe