कन्नडछत्रपती संभाजीनगर
Trending

कोळवाडी येथील गोविंदराव पाटील जीवरख महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात ४२० चा गुन्हा दाखल, परीक्षेत गैरप्रकार तीन महाविद्यालयांना भोवला !

छत्रपती संभाजीनगर, दि.१३ : पदवी परीक्षेचे केंद्र परस्पर बदलवून दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी कोळवाडी येथील गोविंदराव पाटील जीवरख महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीक्षेतील गैरप्रकार करणा-या तीन महाविद्यालयांच्या विरोधात आतापर्यंत कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती अशी, की डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बीकॉम, व बी.एस्सी यासह पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षेत ३१ मार्च रोजी कन्नड तालुक्यातील कोळवाडी येथील महाविद्यालयाने परस्पर केंद्र बदलल्याचा प्रकार घडला होता. भरारी पथकाच्या निदर्शनास सदर बाब आल्यानंतर त्यांनी त्या संदर्भात अहवाल परीक्षा विभागाला सादर केला . स्व. गोविंदराव पाटील जीवरख पाटील वरिष्ठ महाविद्यालय (कोळवाडी,ता -कन्नड) येथील केंद्रावरील विद्यार्थी औराळा येथील राधा गोविंद शिक्षण प्रसार मंडळाच्या शाळेतील केंद्रावर पेपर देत होते .

या घटनेची गंभीर दखल घेऊन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सदर परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय घेतला तसेच ३ एप्रिलपासुन या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शिवाजी कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कन्नड येथे होत आहेत.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या आदेशाने या महाविद्यालयाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, अधिष्ठाता डॉ.प्रशांत अमृतकर व डॉ.दीपक पाचपट्टे यांचा समितीत समावेश होता. सदर महाविद्यालयाने परस्पर केंद्र बदलल्याचा अहवाल समितीने सादर केला होता. या संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांनी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी दि.११ तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, चौकशी समितीने दिनांक ०३ एप्रिल रोजी कोळवाडी येथे जाऊन पाहणी करुन अहवाल सादर केला.

त्याचे अवलोकन करता त्यामध्ये मौजे कोळवाडी येथे महाविद्यालयाच्या पत्त्यावर एक इमारत आढळून आली ज्यावर महाविद्यालयाचे नाव असलेले नाम फक्त दिसून आले. सदर इमारत ही महाविद्यालयांचे गरजा / आवश्यकता प्रमाणे अस्तित्वात असल्याचे निर्देशनास आले नाही. सदर इमारत ही एखादे कुटूंब वास्तव्यास राहू शकेल याप्रमाणे तिचे बांधकाम असल्याचे आढळून आले. ज्यामध्ये स्वयंपाक खोलीचा ओटा देखली अस्तित्वात होता.

तसेच महाविद्यालयासाठी लागणा-या प्राचार्य कक्ष,  कार्यालय, वर्ग खोल्या, मुले-मुलीकरीता स्वच्छतागृह, परीक्षा खोली आढळून आली नाही. तसेच महाविद्यालयात अध्यापनासाठी लागणारे डेस्क, बॅचेस, ब्लॅकबोर्ड, नोटीस बोर्ड, कॉम्प्युटर, प्रिंटर, झेरॉक्स मशिन, इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हते. तसेच आवश्यक असाणार कोणतेही कागदपत्रे व दस्तावेज अस्तित्वात नव्हते. तसेच सदर परिक्षा केंद्रावर परीक्षा सुरु आसल्याचा कोणताही पुरावा सदर महाविद्यालयात दिसून आलेला नाही.

सदर अहवाल समितीने सादर केल्यानंतर मा.कुलगुरु यांनी आम्हाला संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ या नात्याने संबंधितावर गुन्हे दाखल करणेबाबत आदेशीत केले. मंगळवारी सायंकाळी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवरख महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, व्ही.जी.जीवरख यांच्या विरोधात भादंवि १८६० कलम ४२०, ४१७ व ३४ तसेच विद्यापीठ अधिनियम १९८२ कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद केले  की, तरी कोळवाडी येथील परीक्षा केंद्र क्र.२९६ गोविंदराव पाअील जिवरख वरिष्ठ महाविद्यालय येथील संस्थाचालक याने महाविद्यालयाचे मान्यतेसाठी महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले सर्व भौतिक सुविधा व प्रश्ाििक्षत प्राध्यापक असल्याचे विद्यापीठाला लेखी कळवून विद्यापीठाची दिशाभूल केली. तसेच दि.२१ मार्च ते ०१ एप्रिल पर्यंत कालावधीमध्ये असलेल्या परीक्षा विद्यापीठाच्या पुर्वपरवानगीशिवाय मौजे कोळवाडी येथील महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र २९६ यांचे स्थलांतर करुन औराळा येथे घेवून विदृयापीठाची शिस्तभंग करुन अभासी महाविद्यालय तयार करुन विद्यापीठ व शासनाची दिशाभुल करुन फसवणुक केली तसेच विद्यार्थ्यांचे आर्थिक तसेच शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राम कचरु बारहाते हे करीत आहेत.

तीन महाविद्यालयां विरोधात कारवाई :
पदवी परीक्षकेत गैरप्रकार केल्या प्रकरणी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी खंबीर भुमिका घेतली आहे. गोविंदराव जीवरख पाटील महाविद्यालय (कोळवाडी) व वाल्मिकराव दळवी महाविद्यालय (शेंद्रा) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. या दोन्ही महाविद्यालयांचे परीक्षा केंद्र रद्द करुन प्रत्येकी दोन लाखांचा दंड सुनावण्यात आला तसेच शैक्षणिक विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे. तर देवळाई परिसरातील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहे. या पुढील काळातही परीक्षेच्या कामात दिरगांई, गैरप्रकार करणा-या महाविद्यालयांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश परीक्षा विभागात कुलगुरु यांनी दिले आहे.

Back to top button
error: Content is protected !!