महाराष्ट्र
Trending

माजलगावच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 37 हेक्टर NA जमिनीवर पीक विमा काढला ! सीएससी सेंटर चालकासह धाराशिवच्या दोघांवर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – माजलगाव तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. सोनाजीनगर सावरगांवच्या 37 हेक्टर अकृषीक जमिनीवर प्रधानमंत्री फसल बीमा योजनाद्वारे वीमा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी एका विमा कंपनीकडून विमा भरलेला क्षेत्राचा सव्हे करत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने कारखान्याच्या पायाखालील वाळू सरकली. कारखान्याच्या चेअरमनची कुठलीही संमती न घेता बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती उजेडात आली आहे.

प्रतापसिंह बाबासाहेब चौधरी राहणार (आथर्डी पो. इटकर ता. कळंब जि. धाराशिव), संतोष अर्जुन लाखे (रा. सात्रा ता. कळंब जि. धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत. चंद्रकुमार गणपतराव शेंडगे (वय 56 वर्षे व्यवसाय नोकरी सचिव छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. सोनाजीनगर सावरगांव ता. माजलगांव जि. बीड) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालावरून छत्रपती सहकारी साखर कारखान्याची मोजे सावरगांव ता. माजलगांव जि.बीड येथे जमिन गट नं.32/1,33/1,32/2,30/1,37,38/1,41/2,38/2,41/1,36/4, 31/2,28/1 मध्ये एकूण 37 हेक्टर 21 आर. एवढी जमीन आहे.

सदर जमीन ही आजही छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. सोनाजीनगर सावरगांव ता. माजलगांव जि.बीड यांच्या मालकी व ताब्यामध्ये आहे. या सर्व शेतजमीचे तहसीलदार माजलगाव यांच्याकडून अकृषी प्रमाणपत्र घेतले असून सदर जमीनीवर कुठल्याही प्रकारची शेती केल्या जात नाही. तीन ते चार दिवसांपूर्वी एका विमा कंपनीकडून विमा भरलेला क्षेत्राचा सव्हे करत असताना प्रधानमंत्री फसल बीमा योजनाद्वारे कारखान्याच्या या अकृषी क्षेत्रावर कोनीतरी दिनांक 05/10/2023 रोजी वीमा भरल्याचे कारखाना प्रशासनास समजले.

त्यावरून कारखान्याचे सचिव चंद्रकुमार शेंडगे यांनी सदर प्रकरणाची माजलगाव येथील शासनाच्या सी. एस. सी सेंटर वरून माहिती घेतली असता प्रतापसिंह बाबासाहेब चौधरी राहणार (आथर्डी पो. इटकर ता. कळंब जि. धाराशिव) याने संतोष अर्जुन लाखे (रा. सात्रा ता. कळंब जि. धाराशिव) यांचे सी.एस.सी. सेंटर वरुन छत्रपती साखर कारखाण्याच्या अकृषी क्षेत्रावर विमा भरल्याचे दिसून आले.

त्यानंतर कारखान्याचे सचिव चंद्रकुमार शेंडगे माहिती घेतली असता वरील दोघांनी कारखाण्याची कुठलीही संमती न घेता संमतीपत्र दिल्याचा खोटा बॉन्ड तयार करून परस्पर सदर क्षेत्रावर ऑनलाईन विमा भरुन कारखान्याची फसवणुक केल्याचे दिसून आले. तसचे सदर विमा भरण्यासाठी ऑनलाईन जोडलेला बॉन्ड कोठून घेतला तसेच कोणाच्या कामासाठी घेतला हे नमुद केलेले दिसून आले नाही.

याप्रकरणी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे सचिव चंद्रकुमार गणपतराव शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रतापसिंह बाबासाहेब चौधरी राहणार (आथर्डी पो. इटकर ता. कळंब जि. धाराशिव), संतोष अर्जुन लाखे (रा. सात्रा ता. कळंब जि. धाराशिव ) या दोघांवर माजलगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!