छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगर शहरातील मालमत्ता कर थकवणाऱ्यांची झोप उडणार ! लवकरच २१९ मालमत्तेवर जप्तीची कारवाई, सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास घरी जावून वसुली करण्याचे निर्देश !!

छत्रपती संभाजीनगर मनपा प्रशासकाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कंबर कसली

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कंबर कसली असून लवकरच २१९ मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. कराचा भरणा करण्यासाठी सुटही देण्यात आली असून बहुतांश नागरिक कर भरण्यास अनुत्सुक असल्याने आता महानगरपालिकेने कडक भूमीका घेतली आहे. यामुळे कर थकवणार्या मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहे.

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने सतत थकीत मालमत्ता वसुली साठी उपाय योजना राबविण्यात येत आहेत. मनपाच्या वतीने वेळोवेळी थकीत मालमत्ता कर भरणा करण्यासाठी नागरिकांना सुट देण्यात आली आहे. परंतु बहुतांशी नागरिक आपल्याकडील थकीत मालमत्ता कर भरणा करत नाहीत असे प्रशासक यांच्या निदर्शनास आले आहे.

प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई – मनपाचा आर्थिक स्त्रोत वाढवण्यासाठी प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्त यांच्या बैठका घेतल्या व वारंवार आढावा घेऊन वसुली बाबत मार्गदर्शन केले. याचा परिणाम म्हणून झोन न.१ मध्ये एकूण १२३ व झोन न.०८ मध्ये एकूण ९६ अटकावणी व जप्ती चे असे मिळून २१९ प्रकरणे सादर करण्यात आले आहेत. महानगरपालिका अधिनियमनुसार आता या सर्व प्रकरणात प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. तसेच या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून त्या विकण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. लवकरच मालमत्तेवर जप्तीच्या नोटीस बजावण्यात येणार आहेत.

सकाळी ७ ते १० व सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत वसुली करणार- प्रशासक स्वतः पाच लाखांवरील थकीत मालमत्ता कर बाबत आढावा घेत आहेत. लवकरात लवकर या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रशासक यांनी असे ही निर्देश दिले आहेत की बहुतांश रहिवासी मालमत्ता धारक सकाळी व सायंकाळी घरी असतात. यापुढे वसुली कर्मचारी यांनी सकाळी ०७ ते १० व सायंकाळी ०७ ते १० या वेळेत मालमत्ता कर वसुलीचे काम करायचे आहे. तसेच शनिवार व रविवारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोमवारी सुट्टी देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती उप आयुक्त तथा मालमत्ता अधिकारी अपर्णा थेटे यांनी दिली.

एकूण ३५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट- उप आयुक्त तथा मालमत्ता अधिकारी यांच्या प्राप्त माहिती नुसार महानगरपालिकेच्या वतीने एकूण ३५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात चालू आर्थिक वर्षाची २५० कोटी व मागील थकबाकी १०० कोटी रुपये असे एकूण मिळून ३५० कोटी रुपये मालमत्ता कर व पाणी पट्टी १३० कोटी रु. ०१ मे २०२३ ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधी पर्यंत एकूण मालमत्ता कर वसुली ७१.०७ कोटी रु व पाणी पट्टी वसुली १२.३९ कोटी रु असे एकूण मिळून ८३.४६ कोटी रुपये कर वसूल झाला आहे.

Back to top button
error: Content is protected !!