गंगापूरवैजापूर
Trending

वैजापूरचे सतर्क उपविभागीय अधिकारी यांचा महावितरणला दणका ! गंगापूर शहरातील १४ ठिकाणचे वाकलेले विद्युत खांब ७ दिवसांत दुरुस्त करा अन्यथा फौजदारी कारवाई !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – गंगापूर शहरात वेगवेगळ्या सहा ठिकाणी डीपी खराब झाले असून, 14 ठिकाणी विद्युत खांब वाकलेले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा तर होतच असून शिवाय लोकांचा जीवही धोक्यात आला असल्याचा धक्कादायक अहवाल गंगापूरच्या तहसीलदारांनी दिल्यानंतर वैजापूरचे सतर्क उपविभागीय अधिकारी तथा दंडाधीकारी डॉ अरुण जराड यांनी महावितरणाला ही कामे येत्या सात दिवसांत दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे महावितरणची पाचावर धारण बसली असून भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

१. कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी छत्रपती संभाजीनगर, २. उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी छत्रपती संभाजीनगर, ३. उपअभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी गंगापूर, 4. सर्व संबधीत कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी गंगापूर या सर्वांना या आदेशाची प्रत पाठवण्यात आली आहे.

यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ अरुण जराड यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे की, तहसिलदार गंगापूर यांनी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वैजापूर यांच्या कार्यालयाला अहवाल सादर करून कळवले आहे की, गंगापुर शहरात वेगवेगळ्या सहा ठिकाणी डीपी खराब झाले असून, 14 ठिकाणी विद्युत खांब वाकलेले आहेत. त्यामुळे वहातुकीस, दळणवळणास अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कमी उचींवर असलेल्या तारा ताण देऊन सरळ करणे, नवीन डीपी बसविणे, विदयुत खांब दुरुस्त करणे, कंपाउंड करणे आदी कामे करणे आवश्यक असल्याचे कळवले आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या या कृतीमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर तसेच लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

गंगापूरच्या तहसीलदारांनी दिलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता उपविभागीय अधिकारी यांची अशी धारणा झाली आहे की, वीज कंपनीच्या या कृतीमुळे सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर तसेच लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 133 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून गंगापुर शहरातील ही कामे सात दिवसांच्या आत पूर्णपणे दुरुस्त करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. सदरील आदेशाची अवहेलना केल्यास आपणाविरुदध भारतीय दंड संहीता 1860 च्या कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येइल, असेही आदेशात नमूद केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!