छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कंत्राटी मनुष्यबळाची छाटणी करण्याचे आदेश ! माजी सैनिक, अग्नीवीरांना सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव !!

वसुलीचे काम आस्थापनेवरील कर्मचार्यांना देण्याचे निर्देश

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेल्या मनुष्यबळाची छाटणी करण्याचे आदेश आज महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले.

आज सकाळी ११.०० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय येथे प्रशासक जी श्रीकांत त्यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटी मनुष्यबळ आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी विभागनिहाय कंत्राटी मनुष्यबळ किती आहे? ते आकृतीबंध प्रमाणे आहेत का? इत्यादी बाबींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहर अभियंता, विभाग दोन कार्यालय, अतिक्रमण, शिक्षण,आरोग्य, उद्यान, पशुसंवर्धन, यांत्रिकी, मुख्य आवक जावक विभागासह सर्व विभागांचा आढावा घेतला.

या बैठकीत त्यांनी ताकीद दिली की रोख रक्कम हाताळण्याचे आणि वसुलीचे काम कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून न घेता सदरील काम महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावे. याशिवाय प्रत्येक विभागात अनावश्यक आणि जास्तीचे कंत्राटी कर्मचारी यांची छाटणी करावी मात्र ज्या कर्मचाऱ्यांचे काम चांगले आणि प्रामाणिक आहे त्यांना ठेवण्यास हरकत नाही, असे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय सुरक्षा रक्षक म्हणून 50% माजी सैनिक आणि 50% अग्नीवीर यांना ठेवण्याचा प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात त्यांनी आदेश दिले. तसेच प्रत्येक विभागांनी आपापल्या विभागातील कर्मचाऱ्यांचा आराखडा तयार करून किती कर्मचाऱ्यांची गरज आहे याचा अंदाज घेऊन अतिरिक्त मनुष्यबळाची छाटणी करावी, असेही ते म्हणाले.

सदरील बैठकीत अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील सौरभ जोशी, शहर अभियंता ए .बी देशमुख ,उपसंचालक नगर रचना मनोज गर्जे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा ,उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव ,उपायुक्त राहुल सूर्यवंशी, अपर्णा थेटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहूळे, कार्यकारी अभियंता डि के पंडित बी .डी. फड व सर्व विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांची उपस्थिती होती.

सिडको एन ०१ येथील रस्त्यांची पाहणी– आज सकाळी ७.०० वाजता प्रशासक जी श्रीकांत यांनी सिडको एन-०१ टाऊन सेंटर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे आणि काम सुरू असलेले रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रवी मसाले समोरचा रोड नऊ मीटरचा करावा असे निर्देश दिले. याशिवाय येथील ओपन स्पेसची पाहणी केली आणि नागरिकांना याची देखभाल करण्याची निर्देश दिले. यावेळी प्रशासक जी श्रीकांत यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांचे समाधान करण्याचे आश्वासन दिले.

Back to top button
error: Content is protected !!