महाराष्ट्र
Trending

अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा लावू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश !

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विविध शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. २०: अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नका, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह विविध शिष्टमंडळांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी नाशिक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्जधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे जप्ती व लिलाव काढल्याबद्दल शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सध्याची परिस्थितीत लक्षात घेता अल्प कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी तगादा लावू नये, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत काजू बी साठी हमी भाव जाहीर करणे, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास, सिडको गृहनिर्माण लॉटरी सोडतधारकांच्या विविध समस्या, दादर मासळी मंडईच्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सूचना दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!