छत्रपती संभाजीनगर

नायलॉन मांजा विकू नका की विकत घेऊही नका… नाहीतर पोलिसांची कारवाई पक्की!; शहागंजमध्ये या विक्रेत्याच्या मुसक्या आवळल्या, तुम्ही वेळीच सुधरा!!

संभाजीनगर, दि. १५ ः मकरसंक्रांतीचे वेध लागताच बाजारात पतंग व मांजा विक्रीला येतात. गल्लोगल्ली पतंग उडवणारी मंडळी दिसते. राज्‍यात नायलॉन मांजावर बंदी आहे. तरीही अनेक जण या मांजाची विक्री करतात. पोलिसांनी अशा विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा फास आवळला आहे. काल, १४ डिसेंबरला सिटी चौक पोलिसांनी शहागंज भाजी मंडईतील पाण्याच्या टाकीजवळ एकाला नायलॉन मांजाच्या पिशवीसह पकडले. त्याला ताब्‍यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमेर खान नसीब खान (३२, रा. जिन्सी पोलीस ठाण्यासमोर) असे संशयिताचे नाव आहे. पोलीस उपनिरिक्षक रोहित गांगुर्डे, पोलीस अंमलदार मुनीर पठाण, शाहीद पटेल, ओमप्रकाश बनकर, प्रवीण टेकले, बबन इप्पर यांनी ही कारवाई केली.

त्यांच्या पथकाला आमेर हा प्रतिबंधित नायलॉन मांजा हा विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. पंचांना सोबत घेऊन पथकाने पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला. नायलॉन मांजा घेऊन येताच आमिरला ताब्‍यात घेतले.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

त्याच्याकडील प्लास्टिकच्या गोणीची झडती घेतली असता ३३०० रुपयांचा मांजा आढळला. हा मांजा पतंग कटून रोडवर किंवा इतरत्र पडल्यास लहान मुले, वाहनधारक, पादचारी अडकून पडण्याची शक्यता असते. उडणाऱ्या पक्षांनाही दुखापत होते. त्यामुळे शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. तपास पोलीस अंमलदार वाघचौरे करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!