छत्रपती संभाजीनगर
Trending

‘बाप माझा संविधान, जशी समतेची गंगा, माय राबते शेतात, जसा लहरे तिरंगा’

लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र : सामाजिक कवितांचा एल्गार 'कविसंमेलन

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रातर्फे सामाजिक कवितांचा एल्गार ‘कविसंमेलन’ सोमवार, (ता.१५) रोजी मराठी विभागात आयोजित करण्यात आले होते. यावेळी विचारमंचावर लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचे संचालक प्रा.डाॅ.दासू वैद्य, कवयित्री आशा डांगे, कवी हबीब भंडारे, गणेश घुले, देवानंद पवार, सुनील उबाळे यांची उपस्थिती होती.

लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राच्यावतीने वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनी आदरांली वाहण्यासाठी सामाजिक कवितांचा एल्गार ‘कविसंमेलन’ सोमवारी, (ता.१५) कवयित्री आशा डांगे, कवी हबीब भंडारे, गणेश घुले, देवानंद पवार, सुनील उबाळे यांच्या कवितांनी संपन्न झाले.

या संमेलनात प्रत्येक कवींनी तीन तीन कविता सादर करून सामाजिकतेचा जागर केला. कवयित्री आशा डांगे स्त्रियांचे दुःख, वेदना, भोगणे अन् सोसणे मुखर करताना म्हणते, ‘निमूट समर्पित होताना, तिच्यातील आंदोलन, कधीच जाणवू देत नाही बाई.’ / ‘मृत्यूने कायमचीच, संपवली होती भूक, पण या गर्दीतल्या काही जणांची, भूक शमेल का कधीतरी’. तर हबीब भंडारे यांनी वात्सल्याचे आणि धर्मांधतेचे हृदयस्पर्शी चित्र कवितेतून उभे केले.

‘”रेल्वे प्लॅटफॉर्मवर, थंडीत कुडकुडणाऱ्या, नग्न लेकराच्या अंगावर, निपुत्रिक माय बुशरा, टाकते वात्सल्याचं पांघरूण’. / ‘का पुन्हा पुन्हा
वळू लागलीत, मंदिर, मस्जिद, चर्च, दर्गाह, …इत्यादींकडं, माणसाची पावलं’. गणेश घुले यांनी राजकारण आणि धर्मावर नेमकेपणाने भाष्य केले. ‘जाती धर्मावर लिहिले की, मारली जाते गोळी, बाकी सत्तेच्या तव्यावर, भक्ताची भाजतेय पोळी’. देवानंद पवार यांची कविता संविधान, तिरंगा, धम्म याविषयी विलक्षण आशय घेऊन येते.

तिरंगा कवितेत ते म्हणतात, ‘बाप माझा संविधान, जशी समतेची गंगा, माय राबते शेतात, जसा लहरे तिरंगा.’ / ‘भीम ठरला निखारा, जाती जाळून टाकल्या, समतेच्या धम्मासाठी, दिन रातीही जागल्या.’ सुनील उबाळे जात वास्तव आणि महापुरुषांची जातीत विभागणी यावर सडेतोडपणे बोलताना म्हणतात, ‘मग असे काय होते, माझ्या आडनावात? तू अदृश्य झालास, आणि मी अस्पृश्य’./ ‘सा-या महापुरुषांना, वाटून घेतले आम्ही, आम्ही चोरटे आहोत, सज्जनाचा बुरखा धारण केला’.

प्रास्ताविकेतून प्रा.डाॅ.दासू वैद्य यांनी अध्यासन केंद्राची भूमिका विशद केली. त्यावेळी ते बोलताना म्हणाले, विचारवंतांच्या विचारांचा जागर, विधायक विचारांची पेरणी करणे, हा अध्यासन केंद्राचा उद्देश आहे. सद्विचारांचा जागर करणे, आजच्या काळात गरज निर्माण झाली आहे. आंबेडकर विद्यापीठाचे कवी म्हणजे वामनदादा कर्डक होय.

वामनदादांनी बाबासाहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांनी काव्य, शाहिरी, गीतांना बुलंद उंचीवर पोहोचवले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सखाराम आव्हाड, बापूराव वराडे, प्रा. रामेश्वर वाकणकर, डाॅ.विलास गायकवाड आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया धारूरकर, तर आभार प्रदर्शन राजू जाधव यांनी केले.

Back to top button
error: Content is protected !!