विद्यापीठात नव्या शैक्षणिक धोरणावर मंथन, मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसरताील ५५ विभागप्रमुखांचा सहभाग !!
शिक्षकांनी समुपदेशकाची भूमिकाही निभवावी, माजी कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांचे प्रतिपादन
संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – काळानुरुप शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले असून त्यानूसार शिक्षकांनी स्वतःला ’अपडेट’ ठेवावे तसेच शिक्षण, संशोधन व करिअर या करिता विद्यार्थ्यांचे समुपदेशकाची भुमिका समर्थपणे निभवावी, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ माजी कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्रात विभागप्रमुखांची कार्यशाळा बुधवारी दि.पाच घेण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाने या केंद्राला सदर कार्यशाळा मंजूर केली आहे. ’न्यू एज्यूकेशन पॉलिसी-फ्यूचर इनिशेटिव्हज’ या विषयावर बुधवारी दिवसभर ही कार्यशाळा पार पडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कुलगरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी केंद्राच्या संचालक डॉ.धनश्री महाजन, सहसंचालक डॉ.मोहम्मद अब्दुल राफे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर म्हणाले, ’नवीन शैक्षणिक धोरण-२०२०’ च्या अनुषंगाने उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. या अनुषंगाने प्राध्यापकांनी स्वतःमध्ये बदल करुन घेतले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ’अभ्यास क्रमांची रचना, वर्कलोड, मुल्याकंन पध्दती व विविध विद्याशाखेसाठीचे प्रतिमान’ या चतुःसूत्रीचा विचार करणे गरजेचे आहे, असेही डॉ.विद्यासागर म्हणाले.
दुपारच्या सत्रात विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली गटचर्चा झाली. ’अभ्यासक्रमांची रचना व प्राध्यापकांची भुमिका’ या विषयावर डॉ.अशोक चव्हाण, डॉ.प्रवीण वक्ते, डॉ.सतीश पाटील व कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड आदींनी विचार मांडले. संचालक डॉ.धनश्री महाजन यांनी मनुष्यबळ विकास केंद्राच्यावतीने राबविण्यात येणा-या कार्यक्रमांची माहिती दिली.
दिवसभरातील विविध सत्रात चारही अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.प्रशांत अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली ’गटचर्चा’ झाली. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. सहसंचालक डॉ.मोहम्मद अब्दुल राफे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेसाठी अर्चना येळीकर, अस्मिता जोंधळे, राजू कणिसे, अमोद मदन, गौरव जाधव आदींनी प्रयत्न केले. या कार्यशाळेत विद्यापीठ पदव्यूत्तर विभाग मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसरताील ५५ विभागप्रमुख सहभागी होते.
समाजाच्या अपेक्षांची पुर्तता व्हावी : कुलगुरु
गेल्या काही वर्षांत सार्वजनिक विद्यापीठांसमोरील आव्हाने प्रचंड वाढली आहेत. दुसरीकडे उच्च शिक्षण क्षेत्राकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पुर्तता करतांनाच नच्या पिढीला न्याय देण्यात कार्य शिक्षकांनी करावे, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षीय समारोपात म्हणाले. ’नवीन शैक्षणिक धोरण’ची प्रभावी अंमलबजावणी ’स्टेक होल्डर्स’ कडून अपेक्षीत आहे. हा एक प्रयोग असून तो यशस्वी करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe