पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्राध्यापक भरती बंधनकारक, जागा न भरल्यास कोर्सचे प्रवेश रोखणार ! जालन्याचे नॅशनल आर्टस कॉलेज, महाविद्यालय सोयगांव व धाराशिवच्या दोन महाविद्यालयांची सुनावणी !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.२० : पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी दोन प्राध्यापकांची भरती करणे बंधनकारक करण्याचे आदेश कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिले आहेत. तात्काळ भरती न केल्यास पुढील वर्षी संबंधित कोर्सला प्रवेश घेण्यास मनाई करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ भरतीसाठी गेल्या तीन वर्षांपासून कडक धोरण स्वीकारले आहे. तसेच ’अॅकडमिक ऑडिट’ मोहीम सुरु आहे. यामध्ये त्रुटी असणा-या ८८ महाविद्यालयांची सध्या चौकशी सुरु आहे. तसेच पदव्युत्तर महाविद्यालयांसाठीही मोहिम हाती घेण्यात आली आहे. या संदर्भात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने १९ एप्रिल रोजी परिपत्रक जारी केले आहे.
परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व संलग्नित महाविद्यालयांना कळविण्यात येते की, ज्या महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू आहे. त्या महाविद्यालयांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रत्येक विषयासाठी व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार विद्यापीठ मान्यता प्राप्त ०२ शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. आपल्या महाविद्यालयात पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या प्रत्येक विषयासाठी नियुक्त शिक्षकांची विषयानूसार माहिती विद्यापीठ शिक्षक मान्यता पत्रासह २५ एप्रिल पर्यंत शैक्षणिक विभागात सादर करावी.
तसेच ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी व प्रत्येकी विषयासाठी २ विद्यापीठ मान्यता प्राप्त शिक्षकांची नियुक्ती केली नसल्यास अशा महाविद्यालयांना पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या सदर विषयासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे संलग्निकरण पत्र निर्गमित करण्यात येणार नाही व विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीचे संलग्निकरण पत्र प्राप्त झाल्याशिवाय संबंधित महाविद्यालयांनी या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश देवू नयेत. तसेच प्रस्तुत अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे संलग्निकरण पत्राशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारीही संबंधित महाविद्यालयाची राहिल याची नोंद घ्यावी, असे शैक्षणिक विभागाचे डॉ.संजय कवडे यांनी कळविले आहे.
सात महाविद्यालयांची सुनावणी
चार जिल्हयातील सात महाविद्यालयांची त्रुटी संदर्भात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दि.२० दुपारी सुनावणी घेण्यात आली. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, उपकुलसचिव डॉ.संजय कवडे यांची यावेळी उपस्थिती होती. येत्या २० मे पर्यंत त्रुटीची पूर्तता सादर करुन लेखा खुलासा सादर करवायाचे आदेश या महाविद्यालयास कुलगुरु यांनी दिले.
या मविद्यालयात नॅशनल आर्टस कॉलेज जालना, नॅशनल महाविद्यालय जालना, कला महाविद्यालय सोयगांव, कला महाविद्यालय अंकुशनगर, के.टी.पाटील एमबीए कॉलेज उस्मानाबाद, शिवाजी महाविद्यालय परांडा व राजीव गांधी महाविद्यालय भूम यांचा समावेश आहे. संबंधित महाविद्यालयांचा खुलासा समाधानकारक नसल्यास पुढच्या वर्षांचे प्रवेश स्थगित ठेवण्यात येणार आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe