छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

सेवानिवृत्तांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची घोषणा ! निवृत्तीवेतनासह ग्रॅच्युइटी व अन्य लाभ गतीने मिळणार !!

-कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची मोठी घोषणा, पाच कर्मचा-यांचा सेवागौरव

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी, प्राध्यापकांच्या निवृत्तीवेतनासह ग्रॅच्युइटी व अन्य लाभ गतीने मिळावेत यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.३०) सेवागौरव सभारंभ झाला. महात्मा फुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, वित्त व लेखाधिकारी प्रदीपकुमार देशमुख ,संघटनेचे नेते डॉ. कैलास पाथ्रीकर यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी जून अखेरीस सेवानिवृत्त होणा-या पाच कर्मचा-यांना प्रत्येकी दोन लाखांची रक्कम देण्यात आली.

या संदर्भात मे अखेरीस झालेल्या सेवागौरव समारंभात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी रजा रोखीकरण अंतर्गत एक लाखांची रक्कम दोन लाख करण्याची घोषणा केली. दोनच दिवसात झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयाचा लाभ जून अखेरीस निवृत्त होणा-या ५ कर्मचा-यांना झाला. यावेळी विलास टापरे (वरिष्ठ सहाय्यक, आस्थापना विभाग), चांगदेव मोटे (वरिष्ठ सहाय्यक विद्यापीठ मुद्रणालय), रशिद शेख (शिपाई विद्यापीठ अतिथीगृह), रंजित गुंड (प्रयोगशाळा परिचय पदार्थविज्ञान विभाग), प्रदिप गायकवाड (सफाईगार वाणिज्य विभाग) हे कर्मचारी सेवानिवृत्त झाले.

कुलगुरु यांच्या हस्ते या पाचही जणांचा सेवागौरव करण्यात आला. यावेळी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य ही एका नव्या जीवनाची सुरुवात असते. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे तसेच प्राध्यापकांचे नावलौकिक वाढविण्यात मोठे योगदान आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाने व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक लाभ वेळेत मिळणे गरजेचे आहे.

त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल. या कक्षात कर्मचारी वर्ग करून येथून पुढील सर्व सेवानिवृतांचे प्रस्ताव वेळेत मार्गी लागण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी तर संजय लांब यांनी आभार मानले. यावेळी प्रकाश आकडे, अनिल खामंगावकर, मनोज शेटे, रवि भिंगारे, अनिल खेंडके आदीची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!