छत्रपती संभाजीनगर
Trending

कुलगुरुंचा दणका: वाल्मिकराव दळवी महाविद्यालय, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालय, सी.पी.कॉलेज ऑफ एज्यूकेशन व गोविंदराव पाटील जीवरख महाविद्यालयांचे येत्या वर्षातील प्रवेश स्थगित ! टप्प्याटप्प्याने संलग्नीकरणही रद्द करणार !!

शैक्षणिक विभागाकडून चौकशीनंतर कुलगुरुंचे आदेश

Story Highlights
  • पायाभत सुविधा, मनुष्यबळाचा अभाव

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५- पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेल्या चार महाविद्यालयांचे येत्या शैक्षणिक वर्षापासूनचे प्रवेश स्थगित करण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. शैक्षणिक दर्जाबाबत यापुढेही महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी यातून दिले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक विभागाने गेल्या महिन्यात चार महाविद्यालयांना नोटीस बजावली होती. विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या भेटीत या महाविद्यालयात पायाभूत सुविधा व कूशल मनुष्यबळाचा अभाव असल्याचे अहवालत म्हटले होते. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत काही महाविद्यालयात गैरप्रकार झाल्याची घटना उघडकीस आली होती तसेच काही महाविद्यालयात कसल्याही शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे चौकशी करण्यात आली. या पार्श्वभुमीवर चार महाविद्यालयांची चौकशी करण्यात आली.

या ठिकाणी कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा अहवाल विद्यापीठाने पाठविलेल्या समित्यांनी दिला होता. यामध्ये शेंद्रा येथील वाल्मिकराव दळवी महाविद्यालय- डॉ.प्रशांत अमृतकर समिती, देवळाईतील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालय -डॉ.भालचंद्र वायकर समिती , कोळवाडी येथील गोविंदराव पाटील जिवरख महाविद्यालय- डॉ.सुरेश गायकवाड समिती तसेच सी.पी.कॉलेज ऑफ एज्यूकेशन- डॉ.चेतना सोनकांबळे समिती या चार प्राध्यापकांच्या समित्यांनी संबंधित महाविद्यालयात भेट देऊन चौकशी केली.

संबंधित भेटीचा अहवाल त्यांनी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना सादर केला. या महाविद्यालयांमध्ये कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा तसेच अन्य आवश्यक बाबींचा अभाव आहे. त्यामुळे २५ एप्रिल पर्यंत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश शैक्षणिक विभागाकडून देण्यात आले. सदर महाविद्यालयांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी मंगळवारी सुनावणी घेतली. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्यासह सदस्य यावेळी उपस्थित होते.

जीवरख महाविद्यालयाने भरला दोन लाखांचा दंड- पदवी परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी गोविंदराव जीवरख पाटील महाविद्यालय (कोळवाडी) व वाल्मिकराव दळवी महाविद्यालय (शेंद्रा) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. या दोन्ही महाविद्यालयांचे परीक्षा केंद्र रद्द करुन प्रत्येकी दोन लाखांचा दंड सुनावण्यात आला तसेच शैक्षणिक विभागामार्फत चौकशी करण्यात आली. यापैकी जिवरख महाविद्यालयाने दोन लाखांचा दंड मुदतीत भरला आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली. तर वाल्मिकराव दळवी महाविद्यालयाने अजूनही दंड भरला नसून त्यांच्याकडून तो व्याजासह वसूल करण्यात येणार आहे . या पुढील काळातही परीक्षेच्या कामात दिरगांई, गैरप्रकार करणा-या महाविद्यालयांच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश परीक्षा विभागास कुलगुरु यांनी दिले आहेत अशा काळात गैरप्रकार करणाऱ्या कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी खंबीर भूमिका घेतली आहे.

महाविद्यालयांना पाठवलेले पत्र– या चारही महाविद्यालयांना गुरुवारी (दि.चार) कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांच्या स्वाक्षरीने आदेश पाठविण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे :

प्रस्तुत महाविद्यालयाकडे सदरील महाविद्यालयामध्ये पायाभुत सुविधा उपलब्ध नसणे. आवश्यक क्षेत्रफळासह अद्ययावत प्रयोगशाळा व आवश्यक प्रयोगशाळा साहित्य नसणे इत्यादी व तत्सम कारणामुळे व सदरील महाविद्यालयाकडे सुरु असलेल्या एकूण क्षमतेप्रमाणे एका तुकडीस शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सदरील अभ्यासक्रमास नवीन प्रवेश बंद करण्याचे निर्देश महाविद्यालयाच्या व्यवस्थापन तसेच महाविद्यालयीन प्रशासनास देण्यात येत आहे.

प्रस्तुत आदेशातील अनुक्रमांक (२) अन्वये विनार्दिष्टित करण्यात आलेल्या बंद अभ्यासक्रमांबाबत महाविद्यालयाने सहा महिन्यांच्या आत विद्यापीठास अनुपालन अहवाल सादर करावे तद्नंतर महाविद्यालयाने विद्यापीठाकडून जज्ञ समितीद्वारा तपासणी करुन सदरील अभ्यासक्रम पुढे सुरु ठेवाये किंवा कसे, याबाबत विद्यापीठाच्या विद्या परिषदेद्वाारे निर्णय घेण्यात येईल.

प्रस्तुत महाविद्यालयातील ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश बंद करण्यात आलेले आहे. त्या अभ्यासक्रमाच्या लागू असलेल्या द्वितीय/ तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम व शैक्षणिक कार्य महाविद्यालयाने आवश्यक त्या अध्यापकांची नेमणूक करुन पूर्ण करणे अनिवार्य आहे.
प्रस्तुत महािवद्यालयाच्या व्यवस्थापन प प्रशासनाने खोटी व बनावट माहितीबाबतचे दस्ताऐवज समितीस अथवा विद्यापीठास सादर केल्याचे आढळून आल्यास नियमानूसार सर्व संबंधितांवर पोलिसामध्ये तक्रार करण्यात यावी.

प्रस्तुत महाविद्यालयाच्या संदर्भात विद्यापीठाने पारित केलेले आदेश विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी परिपत्रकाद्वारे प्रसिध्द करण्यात यावे तसेच सदरील आदेश विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहितीसाठी प्रसिध्द करण्यात यावे. तद्अनुषंगाने सदरील अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेवू नये. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास याबाबत विद्यापीठ जबाबदार राहणार नाही, असेही सदरील परिपत्रकात नमुद करून प्रसिध्दी देण्यात यावी.

प्रस्तुत महाविद्यालयास सोई सुविधा, प्राध्यापक व इतर बाबी नियमाध्यमे विहित केल्यानुसार नसतांना सुध्दा सदरील महाविद्यालयास वार्षिक संलग्निकरण एवढया सर्व अभ्यासक्रमांना कोणत्या नियमानुसार संलग्नीकरण मान्यता देण्यात आलेली आहे. या सदंर्भात तत्कालीन काळातील सर्व चौकशी समित्या चौकशी करुन त्यास जबाबदार असलेले समिती सदस्य व विद्यापीठ अधिकारी यांच्यावर नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी.

शैक्षणिक गुणवत्तेत तडजोड नाही : कुलगुरू

पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्ष घेणा-या विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे ही संबंधित महाविद्यालयांची नैतिक जबाबदारी आहे. प्राचार्य, प्राध्यापक भरती व तांत्रिक सुविधा बाबत वारंवार सूचनाही करण्यात आल्या आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष करणा-या संस्थाच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाने कडक भूमिका घेण्याचे ठरविले आहे. शैक्षणिक गुणवत्ता, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता व पायाभूत सुविधा या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतली आहे.

Back to top button
error: Content is protected !!