महाराष्ट्र
Trending

जालन्यात डुप्लिकेट सोन्याचे बिस्कीट देणारी टोळी, आमिष दाखवून लुबाडतात ! सावरकर चौक ते बसस्टॅंड परिसरात पानशेंद्राच्या महिलेची फसवणूक !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – जालन्यात डुप्लिकेट सोन्याचे बिस्कीट देणारी टोळी सक्रिय असल्याचा प्रकार समोर आला आहे. सावरकर चौक ते बसस्टॅंड परिसरात पायी जाणार्या महिलेला थाप मारली. सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवले. त्या महिलेकडून ७ हजार व सोन्याची पोत असा ३० हजारांचा ऐवज घेवून एक सोन्याचे बिस्कीट दिले. मात्र, ते बिस्कीट डुप्लिकेट निघाले. जालना शहरातील सावरकर चौक ते बसस्टॅंड परिसरात हा प्रकार घडला.

कमलबाई बाबासाहेब पाचरणे (वय 50 वर्ष, व्यवसाय घरकाम /मजुरी रा. पानशेंद्रा ता. जि. जालना) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.19/09/2023 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास नातेवाईकांकडे गावी जाणे असल्याने सदर महिला जालना येथे रिक्षाने सिंधीबाजार जालना येथे आली होती. तेथून उतरून जालना बसस्थानक कडे पायी जात असतांना सावरकर चौक जवळ Vivo मोबाईल शॉप समोरून दुपारी 01.05 वाजे दरम्यान महिलेच्या पाठीमागुन दोन अनोळखी भामटे आले.

ते दोन भामटे सदर महिलेला म्हणाले आई तुमच्या पिशवीतून पिवळ्या रंगाचा सोन्यासारखा दिसणारा तुकडा पडला आहे. तो आम्हाला मिळाला. त्यामुळे सदर महिला त्यांनी दाखवलेला सोन्याचा तुकडा पाहत असताना त्यांनी सदर महिलेला बाजुच्या छोट्या गल्लीमध्ये येण्यास सांगितले. त्याप्रमाणे सदर महिला व ते दोन्ही व्यक्ती बाजुच्या गल्लीत गेले.

तेथे गेल्यावर त्यातील एक जण सदर महिलेला म्हणाला तुम्ही मला एक लाख रुपये दिले तर मी तुम्हाला हे सोन्याचे बिस्कीट देतो. त्यावेळी त्याच्या बाजुला उभा असलेला दुसरा व्यक्ती सदर महिलेला म्हणाला की, आपण दोघे मिळुन ते सोन्याचे बिस्कीट घेऊ व यांना पैसे देऊ असे म्हणाला.

त्यामुळे सदर महिलेने तिच्याकडील रोख रक्कम 7000/- रुपये व गळ्यातील ४ग्रॅम सोन्याची पोत किं. अं.30,000/-रुपये काढुन त्यांना दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने एक पिवळ्या रंगाचे सोन्याचे बिस्कीट दिले. ते सोन्याचे बिस्कीट घेऊन सदर महिला सोनाराच्या दुकानात गेली. मात्र, ते सोन्याचे बिस्कीट बनावट असल्याचे समजले.

याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर एस बी जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!