महाराष्ट्र
Trending

अवकाळीचा महावितरणला मोठा झटका, गूल झालेली बत्ती ४८ तासांनी पूर्ववत !

नांदेड जिल्ह्यात अवकाळी, गारपिटीने साडे तीन कोटींचे महानुकसान

नांदेड, दि. 24 मार्च : अवकाळी पावसामुळे झालेली गारपीट आणि वादळवाऱ्यामुळे शेतकऱ्यांसोबतच महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये विजेच्या पोलसह रोहित्रेही जमीनदोस्त झाल्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा चोवीस तास मेहनत करून 48 तासाच्या आत पूर्ववत करण्यात महावितरणला यश प्राप्त झाले आहे.

गुरूवारी (दि.16 मार्च) सायंकाळी मुदखेड, किनवट तसेच नांदेड ग्रामीण विभागाच्या परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे महावितरणला जवळपास साडे तीन कोटी रुपयांचा मोठा फटका बसला आहे. मुदखेड उपविभागातील बारड, पांढरवाडी, तिरकसवाडी, डोंगरगाव, शेम्बोली, निवघा, बोरगाव, वैजनाळा पारडी, मुगट, खांबाळा आदी वीस गावे तसेच किनवट उपविभागातील काही गावांना वीजपुरवठा करणारे उच्चदाब वीजवाहिनीचे 538 पोल आणि लघूदाब वाहिनीचे 880 पोल, 34 रोहित्रे त्याचबरोबर 25 किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या. यासर्व पडझडीमुळे गावे व शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्राचाही वीजपुरवठा खंडित झाला होता.

बाधीत झालेल्या गावांचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यास प्राधान्य देत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणा त्वरीत कामाला लागली. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून ताबडतोब चार देखभाल दुरूस्ती करणाऱ्या एजन्सींना पाचारण करून वरिष्ठ अभियंते, जनमित्र तसेच बहिस्थ कर्मचाऱ्यांच्या टीमने 24 तास कार्यरत राहून मुदखेड, किनवट व नांदेड ग्रामीण उपविभागाच्या हद्दीतील 10 ते 12 गावांचा वीजपुरवठा 24 तासात पुर्ववत केला.

मुदखेड परिसरातील उच्चदाब यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्यामुळे निवघा उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा ठप्प झाला होता. तत्काळ पर्यायी यंत्रणाही उभे करणे कठीण होते. अशा परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे साहित्य वरिष्ठ कार्यालयाने उपल्बध करून दिल्यामुळे उर्वरीत गावांचा वीजपुरवठा कमीत कमी वेळेत पुर्ववत करण्यात यश मिळाले. आज रोजी सर्व गावे व शेतीचा वीजपुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!