महाराष्ट्र
Trending

महावितरणच्या धडक कारवाईत २० वीटभट्टयांच्या वीज चोरीचा पर्दाफाश ! हॉटेलवाल्याने मीटरवर रिमोटने कंट्रोल करून केली १९२२८ युनीटची चोरी !!

१३ लाख ८५ हजारांची वीजचोरी उघड, दंडाची रक्कम न भरल्यास गुन्हे दाखल होणार

नांदेड, दि.२५ मे : महावितरणच्या नांदेड शहर विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या संशयित वीजचोरांवर सुरक्षा व अंमलबजावणी पथकाने केलेल्या विशेष कारवाईत वीजचोरीची ४१ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात ग्राहकांनी ४९ हजार २३७ युनीटची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. या सर्व वीजचोरांवर वीज कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करत वीज बील व दंडाची रक्कम असे एकत्रीत एकूण १३ लाख ८५ हजार २१४ रूपयांचे देयक देण्यात आले आहे. देयक न भरणाऱ्या ग्राहकांवर वीज कायद्यान्वये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार शनिवारी (दि.२०) नांदेड शहर व एमआयडीसी उपविभागाच्या परिसरातील संशयित वीजग्राहकांची पाहणी केली असता सुरक्षा व अंमलबजावणी पथकाच्या विशेष कारवाईत ४१ व्यावसायिक व घरगुती वीजग्राहकांनी आकोडे टाकून, मीटरमध्ये छेडछाड करून तसेच रिमोट द्वारे वीजचोरी केल्याचे आढळून आले.

यामध्ये नांदेड शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाने मीटरला रिमोट द्वारे थांबवून तब्बल १९ हजार २२८ युनीटची वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. या ग्राहकास ४ लाखाचे बील व १ लाख ७० हजाराच्या दंडाचे बील आकारण्यात आले आहे. त्याचबरोबर धनेगाव, वाजेगाव परिसरातील २० वीटभट्टयांची वीजचोरी ३० हजार युनीटची उघडकीस आणली आहे. या २० वीटभट्टीधारकांनी आकोडो टाकून ७ लाख ५ हजार रूपयांची वीजचोरली आहे.

तर आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्या वांगी या गावातील ११ जणांनी ५५ हजार ४०५ रूपयांची आणी वडगाव मधील ९ आकोडे बहाद्दरांनी ५४ हजार ३०० रूपयांची वीजचोरी केली आहे. या सर्व वीजचोरांवर विद्युत कायद्याच्या कलम १२६ व १३५ नुसार दंडात्मक कारवाई करत एकूण १३ लाख ८५ हजार २१४ रूपयांची वीजचोरीची बीले देण्यात आली आहेत.

महावितरणच्यावतीने सातत्याने वीजचोरीविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. तसेच कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत झालेल्या वीजग्राहकांनी अनधीकृतपणे वीजवापरत असल्याचे आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सोबतच अशा वीजग्राहकांना शेजाऱ्यांनी वीजपुरवल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वीजचोरीविरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!