शहागंजमधील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले, तब्बल ४० फूट अतिक्रमण काढल्याने ५० फूटी रस्त्याने घेतला मोकळा श्वास !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – शहराचा वर्दळीचा भाग असलेल्या शहागंज भाजीमंडई परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण आज पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. सुरुवातीला व्यापार्यांनी विरोध केला यामुळे पोलिस बंदोबस्त मागवण्यात येऊन जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यात आले. या रस्त्यावर तब्बल ४० फूट अतिक्रमण व्यापार्यांनी केले होते. त्यामुळे अवघा १० फुटांचा रस्ता राहिला होता. आज झालेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे या ५० फुटी रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
शहराच्या मध्य भागात वर्दळीच्या ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी आणि इतर नागरिकांनी महानगरपालिकेच्या रस्त्यावर दहा बाय दहा बाय पंधरा या आकाराचे पत्र्याचे स्वरूपात शेड मारून अतिक्रमण केले होते. सदर अतिक्रमण धारकांविरुद्ध आज सकाळी प्रशासकांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू झाली.
ही मोहीम शहागंज येथील मुख्य रस्ता दुर्गाप्रसाद आरोग्यधाम दवाखाना येथून प्रारंभ करण्यात आली. नागरिकांनी केलेले शेड आणि जमिनीलगत सिमेंट बांधकाम ओटे तयार करून अतिक्रमण करण्यात आले होते. सदर ५० फूट पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. याआधी हा रस्ता फक्त दहा फुटी होता. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सर्व अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले.
सुरुवातीला काही व्यापाऱ्यांनी कारवाईला विरोध केला परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता सिटी चौक येथील पोलीस कर्मचारी बोलावून ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली. या रस्त्यावर एकूण ४० ते ५० अतिक्रमण धारक होते. यामध्ये ड्रायफूट विक्रेते, चिकन आणि बकरा मटन विक्रते, तसेच भाजी विक्रेते यांचे अतिक्रमण होते. यांना यापूर्वी तीन वेळेस प्रशासकांनी स्वतः स्थळ पाहनी करून अतिक्रमण काढणे बाबत आदेशित केले होते.
या वेळी व्यापाऱ्यांनी तोंडी विनंती करून वेळ मागून घेतला होता परंतु अतिक्रमण काढले नव्हते. याच भागात महानगरपालिकेने जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय धरतीवर फिश मार्केट तयार केले आहे. या फिश मार्केट लगत सुद्धा याही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली होती. ते पूर्णपणे जेसीबीच्या साह्याने निष्काषित करण्यात आली आणि फिश मार्केट परिसर पूर्ण मोकळा करण्यात आला.
आता शहागंज पासून स्टेट टॉकीज कडे जाणारा ५० फुटाचा रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी केलेले पूर्ण बांधकाम मलबाही उचलण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्र हिंदी विद्यालय असलेले शॉकपचे अंदाजे ३० बाय १० दुकान पूर्णपणे निष्कसित करण्यात आले आहे. या ठिकाणी असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना येथील आवाजाचा त्रास होत होता. तसेच शाळेभोवती दुकानाचे अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत नेहमीच शाळेतील विद्यार्थी आणि पालक यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या दुकानांचे अतिक्रमण पाडण्यात आले.
ही कारवाई प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त २ तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, सागर श्रेष्ठ ,मजहर अली, महिला पोलीस ए एस आय ठाकरे, सिटी चौक येथील पोलीस कर्मचारी यांनी कारवाई सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe