महाराष्ट्र
Trending

पाच महिन्यांत राज्यात १९ हजार ५३३ तरुणी आणि महिला बेपत्ता ! जर इतक्या मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता होत असतील तर आपण गप्प बसायचे का ?: शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीने कायमच जागृक राहावे- शरद पवार

मुंबई, दि. १२ –  महाराष्ट्राच्या पावसाळी विधानसभेत अनिल देशमुख यांनी एक प्रश्न विचारला होता तो असा की, १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ या ५ महिन्याच्या काळात महाराष्ट्रात किती तरुणी महिला बेपत्ता झालेल्या आहेत ? आणि या प्रश्नावर सरकारच्या वतीने लेखी उत्तर देण्यात आले ते असे की, १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ या ५ महिन्याच्या काळात राज्यात १९ हजार ५३३ तरुणी आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. हा काय छोटा आकडा आहे का ? हा आकडा म्हणजे पोलीस स्टेशनला नोंद झालेल्या तक्रारी, परंतु नोंद न झालेल्या घटना किती असतील ? या आकड्यात १८ वर्षांखालील १ हजार ४३३ मुली आणि १८ हजार १०० महिला अशा एकूण १९ हजार ५३३ मुलींचा आकडा राज्य सरकारने अनिल देशमुख यांना लेखी स्वरूपात दिलेला आहे. जर इतक्या मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता होत असतील तर आपण गप्प बसायचे का ? आणि म्हणून मला तुम्हा सगळ्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, हे सर्व प्रश्न आपल्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या सर्व प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला आघाडी ही कायमच जागृक असले पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीयअध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व उपस्थित महिला-भगिनींना मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये सातबाराचा उतारा जो असतो त्यावर पती-पत्नीचे नाव असलं पाहिजे- पवार म्हणाले की, प्रांत अध्यक्षांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही कार्यक्रम हातात घ्यायचे आहेत. महिला धोरण, आरक्षण या विषयांवरील चर्चा आज येथे झाली. कर्तुत्वाचा वाटा फक्त पुरुषांकडे असतो हे चुकीचे असून तुम्ही स्त्रियांनी देखील आज दाखवून दिले की, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही कर्तुत्ववान स्त्री नक्कीच बनू शकता. ‘प्रॉपर्टीत अधिकार’ याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झालेली नाही असे मला वाटते. माझ्याकडे सत्ता असताना आम्ही एक निर्णय घेतला की, शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये सातबाराचा उतारा जो असतो त्यात दोघं पती-पत्नीचे नाव असलं पाहिजे. हा निर्णय काही ठिकाणी राबवला गेला परंतु, १००% राबवले गेले असे दिसत नाही. तर आता हे कार्यक्रम आपल्याला हातामध्ये घेऊन सरकार दरबारी आग्रह धरावा लागेल. माझ्याकडे संरक्षण खाते होते तेव्हा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या प्रमुखांचा अतिशय विरोध असताना देखील संरक्षण खात्यात मुलींना आरक्षण दिले गेले. आणि आज आपण पाहतो २६ जानेवारीला दिल्लीची परेड ही मुलीच करत असतात.

जेथे महिलांची धिंड काढली जाते, व्यक्तिगत हल्ले केले जातात तेथे राष्ट्रवादीच्या महिलांनी रस्त्यावर उतरलेच पाहिजे- मणिपूर सारखी स्थिती आज आपण सर्वांनीच पाहिलेली आहे, जेथे महिलांची धिंड काढली जाते, व्यक्तिगत हल्ले केले जातात, जिवंत मारले जाते आणि हे सर्व भारतात होतं याबद्दलची आपली भूमिका अतिशय जागृकतेने आपण प्रत्येकाने मांडायला हवी. असा काही प्रकार घडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या भागातल्या भगिनी या रस्त्यावर उतरल्याच पाहिजे आणि त्यासाठी आग्रह हा धरलाच पाहिजे. ऱ्हास्त प्रश्नांसाठी रस्त्यावर येणे हा आपला हक्क आहे आणि त्याबाबत भूमिकाही आपण घेतलेच पाहिजे.

प्राथमिक शिक्षणातून मुलांना बाजूला ठेवण्याचा जो काही डाव- समायोजन करण्यासाठी काही वर्ग, शाळा बंद करायचे असे राज्य शासनाकडून सांगण्यात येत आहे. आपण महाराष्ट्रात आहोत. सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध असताना देखील पहिली शाळा काढली. आणि आत्ता महाराष्ट्रात शाळा बंद करणे, मुलांना शाळेच्या बाहेर काढणं हे सर्व सुरू असताना महाराष्ट्रातल्या सावित्रीच्या लेकी अशा गप्प बसणे याचा जाब लोक आपल्याला विचारतील आणि म्हणूनच माझा आग्रह आहे की, तुमच्या परिसरात प्राथमिक शिक्षणातून मुलांना बाजूला ठेवण्याचा जो काही डाव चाललेला आहे तो आज थांबवून आपण त्याबद्दलची काळजी घ्यायला हवी.

सरकारी नोकऱ्यांची कमतरता एका बाजूला आणि रिक्त जागांचा प्रश्न मोठा- आज सरकारी नोकऱ्यांची कमतरता आहे. सरकारी नोकऱ्यांची कमतरता एका बाजूला आणि रिक्त जागांचा प्रश्न मोठा आहे. महाराष्ट्रात १३८ प्रवर्गांच्या नोकऱ्यांची भरती करायची, परंतु सरकारचे मत असे आहे की, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती करू. सरकारी नोकरी मिळते आणि काही दिवसांनंतर ती कायम होते आणि आयुष्यभर काम करायची ती संधी मिळते, कुटुंबात एक प्रकारचे स्वास्थ्य असतं. परंतु त्या उलट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरी मिळाली तर ती फक्त एका ठराविक काळापूर्तीच असते. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या नोकरीत आरक्षण नाही. या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य लोक आपल्या मूलभूत अधिकांरापासून वंचित होतात. आणि मला खात्री आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या नोकरीत महिलांना संधीच मिळणार नाही आणि त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रित येऊन यासंदर्भातला विरोध करणारा कार्यक्रम घेवून सरकारला जागे करायला हवे.

Back to top button
error: Content is protected !!