महाराष्ट्र

गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार ! प्रो गोविंदाचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून अभिषेक बच्चन यांच्या नावाची घोषणा !!

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३१ : दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वरळी येथील एनएससीआय डोम येथे देशातील पहिली प्रो गोविंदा लीग २०२३ या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, बाळा नांदगावकर, नितीन देसाई, अभिनेते अभिषेक बच्चन, पूर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने 50 हजार गोविंदांना विमा कवच दिले होते. 50 हजार नोंदणी पूर्ण झाली आणि अनेक गोविंदांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे आणखी 25 हजार गोविंदांना विमा कवचाला तत्काळ मंजुरी दिली. आता ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण दिले आहे. दहीहंडी उत्सव स्व.आनंद दिघे यांनी ठाणे शहरात प्रथम मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली. थरांचे विक्रमही ठाण्यातील गोविंदांनी केले. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आली आहे.

राज्यातील सर्व नागरिकांनी आता गणेशोत्सव, नवरात्री असे सन उत्साहात साजरा करावेत. पूर्वीचे सर्व निर्बंध आता काढून टाकले आहेत. राज्यातील परंपरा सण, उत्सव, एकता, बंधूभाव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असतात. प्रो कबड्डीसारखे प्रो गोविंदासाठी अभिनेते अभिषेक बच्चन यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, देशात पहिल्यांदा गोविंदाचा विमा उतरविण्यात आला आहे. इतर राज्यातील गोविंदा पथकांनी आपल्या राज्यात विमा घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनाही सहकार्य करण्यात आले आहे.यापुढे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा मंत्री बनसोडे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांचे प्रो गोविंदा लीगचे स्वप्न होते ते आज साकार होत आहे. हा खेळ जागतिक पातळीवर घेवून जाण्यासाठी शासन प्रयत्न करील. पारंपरिक खेळांना जागतिकस्तरावर नेण्यासाठी आयपीएल, प्रो कबड्डी यासारख्या लोकप्रियता या स्पर्धेच्या निमित्ताने वाढणार आहे. या स्पर्धेसाठी एमआयडीसी आणि दहीहंडी समन्वय समितीचे सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेचे थीम ‘घेवून टाक’ ही आहे. तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. पहिले बक्षीस ११ लाख रुपये, दुसरे बक्षीस ७ लाख रुपये, तिसरे बक्षीस ५ लाख रुपये आणि चौथे बक्षीस ३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!