छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

शेतकऱ्यांना प्रति कुटुंब सदस्य 170 रुपये अनुदान देण्याचे निर्देश !

पुरवठा विभागाची बैठक, डिसेंबर अखेर अनुदान वितरण करा- जिल्हाधिकारी स्वामी

Story Highlights
  • एपीएल शेतकऱ्यांना ३० डिसेंबर पर्यंत बॅंक खाते तपशिलासह आधार संलग्निकरण करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर,दि.7 – उन्नत शेतकरी गटातील शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्रति कुटुंब सदस्य १७० रुपये अनुदान देण्याची पुरवठा विभागाची योजना आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ही योजना राबविली जाते. तथापि, जिल्ह्यातील ३१ हजार ६१४ शेतकऱ्यांचे अनुदान वितरण बॅंक खाते तपशिल उपलब्ध न करून दिल्यामुळे प्रलंबित आहे. हे अनुदान वितरणातील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करुन डिसेंबर अखेर अनुदान वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पुरवठा विभागाला दिले.

अनुदान वितरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांपैकी बॅंक खात्याचे तपशिल नसणे, तसेच आधार संलग्निकरण नसणे या दोन प्रमुख तांत्रिक अडचणी असून शेतकऱ्यांनी दि.३० डिसेंबर पर्यंत आपले आधार संलग्निकरण करुन घ्यावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पुरवठा विभागाची बैठक घेण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी, पुरवठा निरीक्षक, अन्नधान्य वितरण अधिकारी आदी उपस्थित होते.

बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात उन्नत शेतकरी गटातील (एपीएल फार्मर)३१ हजार ६१४ शेतकऱ्यांचे अनुदान वितरण प्रलंबित आहे. हे अनुदान शिधापत्रिकेवरील प्रति सदस्य १७० रुपये प्रमाणे दरमहा दिले जाते. तथापि, त्यासाठी बॅंक खाते तपशिल व आधार संलग्निकरण असणे आवश्यक आहे. अद्याप १७ हजार लाभार्थ्यांचे आधार संलग्निकरण प्रलंबित आहे. तर ३१ हजार ६१४ जणांचे बॅंक खाते तपशिल नसल्याची माहिती देण्यात आली. तसेच आतापर्यंत २५ हजार ७८६ शिधापत्रिका धारकांना २५ कोटी ३९ लक्ष रुपयांचा लाभ मार्च अखेर वितरीत झाला आहे.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, शेतकऱ्यांचे आधार संलग्निकरण, बॅंक तपशिल गोळा करण्यासाठी विशेष मोहिम राबवून माहिती घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनीही आपले आधारसंलग्निकरण दि.३० डिसेंबर पर्यंत करुन घ्यावे,असे आवाहन करण्यात यावे. डिसेंबर अखेर प्रलंबित अनुदान वितरणाचा प्रश्न निकाली काढावा,असे निर्देश त्यांनी दिले.यासोबतच अन्य योजनांसाठीही आधार संलग्निकरण, ई- केवायसी याबाबतही आढावा घेण्यात आला.स्वस्तधान दुकानातील अन्न धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिकेवरील प्रत्येक लाभार्थ्यांचे ई- केवायसी करण्याची मोहिमही राबवावी. शिधापत्रिकेसोबत कुटुंबप्रमुखाच्या मोबाईल क्रमांकाचे संलग्निकरण करावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

Back to top button
error: Content is protected !!