छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

कैलास नगर स्मशानभूमी रस्ता बाधित १५ अतिक्रमणांवर जेसीबी फिरवला ! १० वर्षांपूर्वी जागा संपादित करून मोबदला देवूनही काही महाभागांनी बांधकाम करून दिले होते भाड्याने !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७- महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज लक्ष्मण चावडी चौक ते कैलास नगर स्मशान भूमी डीपी रस्त्यावरील रस्ता बाधित १५ अतिक्रमणावर जेसीबी फिरवण्यात आला. या कारवाईमुळे रस्त्यावरील वाहनधारकांनी सुटकेचा श्वास घेतला. विशेष म्हणजे सुमारे १० ते ११ वर्षांपूर्वी जागा संपादित करून मोबदला देवूनही काही महाभागांनी तेथे पुन्हा बांधकाम करून ती जागा अनाधिकृतपणे भाड्याने दिली.

महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत लक्ष्मण चावडी ते पुढील चौकापर्यंत 80 फूट व नंतर 60 फूट या डीपी रस्त्यावरील आज एकूण 15 बाधित मालमत्ता निष्काशीत करण्यात आल्या. या बाधित मालमत्ता यापूर्वीही 2012 मध्ये निष्काशीत करण्यात आल्या होत्या व काही नागरिकांना याचा मोबदला सुद्धा देण्यात आला तरी देखील या लोकांनी रस्ता न झाल्याने पुन्हा अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. या रस्त्यावर कैलासनगर स्मशान भूमी असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असल्याने वाहतुकीला नेहमीच अडथळा होत होता.

याबाबत प्रशासक जी श्रीकांत यांनी नुकतीच या रस्त्याची पाहणी केली होती. लगेच स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू झाल्याने मागील आठवड्यात अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त सविता सोनवणे यांनी या रस्त्यावर पूर्ण पाहणी करून नागरिकांशी चर्चा करून आपापले रस्ता बाधित मिळकत अतिक्रमणे काढण्याबाबत सूचना केल्या होत्या. काही नागरिकांनी स्वतः टपऱ्या वगैरे लोखंडी शेड काढले होते परंतु माती व कच्या विट कामात झालेले बांधकाम काढले नव्हते म्हणून आज सकाळी प्रथम या नागरिकांना पुन्हा एक तासाचा अवधी देऊन त्यांचे दुकानातील मौल्यवान वस्तू व घरातील वापरणे योग्य साहित्य काढून देण्यात आले व नंतर जेसीबीच्या साह्याने हे सर्व अतिक्रमण निष्कर्षित करण्यात आले.

या अतिक्रमणामध्ये नागरिकांनी मोबाईल दुकान ,कटिंगचे दुकान, इलेक्ट्रिक वस्तू रिपेरिंगचे दुकान भाजी विक्रेते, चिकन मटन चे दुकान तर काही लोकांनी राहण्यासाठी खोल्या बांधल्या होत्या इतर काही नागरिकांनी या ठिकाणी बांधकाम करून भाड्याने दिले होते व स्वतः दुसऱ्या ठिकाणी राहत होते. असे सर्व बांधकामे आज निष्कासित करण्यात आले. एक दोन नागरिक वगळता बाकीच्या सर्व लोकांनी महानगरपालिका प्रशासनास यावेळी सहकार्य केले. व हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली.

आज लक्ष्मण चावडी ते कैलाश नगर जाताना डाव्या बाजूचे अतिक्रमण काढण्यात आली उद्या उजवी बाजूचे अतिक्रमणे बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहे. प्रशासक यांनी या भागातील नागरिकांना व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे की आपण स्वतः हे अतिक्रमणे बांधकामे काढावी व स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या रस्त्यात सहकार्य करावे. आजची कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त मा. सौरभ जोशी, उपायुक्त सविता सोनवणे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे,नगर रचना विभागाचे कनिष्ठ अभियंता बोंबले,साळवे, सुरज सावधनकर, जिन्सी पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी, मनपा विद्युत विभाग व माजी सैनिक यांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण काढण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!