महाराष्ट्र
Trending

टीईटी घोटाळ्यासंदर्भात तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळले !

तारांकित प्रश्नातील मंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांशी संबंधित भाग परस्पर वगळल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

Story Highlights
  • विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा भाग वगळण्याच्या प्रकरणाची चौकशी करुन निवेदन करण्याचे अध्यक्षांचे आदेश
  • तारांकीत प्रश्न सूचनेतील वगळलेला भाग विद्यमान मंत्री व सत्ताधारी आमदारांची मुले आणि नातेवाईकांचा समावेश आहे.

नागपूर, दि. २१ डिसेंबर – ‘टीईटी’ घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला.

दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करुन त्याची माहिती सभागृहात देण्यात येईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिली. त्यानंतर हा प्रश्न उत्तरासाठी आणि निवेदनासाठी राखून ठेवण्यात आला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीईटी घोटाळ्या संबंधी तारांकित प्रश्न सुचना क्र. ५०४९१ दाखल केली होती. दाखल केलेला प्रश्न सात भागांचा होता. मात्र प्रश्नोत्तराच्या यादीत मंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांशी संबंधित दोन भाग विधानमंडळ सचिवालयाने जाणीवपूर्वक वगळले.

या टीईटी घोटाळ्यामुळे मेरीटच्या अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम ७० मध्ये एखादा प्रश्न स्वीकृत व्हावा यासाठी त्याने एकुण १८ शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत. माझ्या प्रश्न सुचनेतील वगळलेला प्रश्न भाग १८ शर्तीमधील नेमक्या कोणत्या शर्ती पूर्ण करीत नाहीत, हे मला कळले पाहिजे.

तारांकीत प्रश्न सूचनेतील वगळलेला भाग विद्यमान मंत्री व सत्ताधारी आमदारांची मुले आणि नातेवाईकांचा समावेश आहे. संबधित शिक्षकांवर ६० दिवसात सुनावणी घेऊन कारवाई करा, असे आदेश असतानाही केवळ काही मंत्री महोदयांची, काही आमदार महोदयांची व काही अधिकाऱ्यांची मुले या घोटाळ्यात असल्याने कारवाईला उशीर होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

Back to top button
error: Content is protected !!