महाराष्ट्र
Trending

सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा गैरव्यवहार ! बदल्यांचे आदेश पहाटे ४ वाजता काढून अधिकाऱ्यांना whatsappवर दिले !!

शासन आपल्या दारी आणि अधिकारी मंत्र्यांच्या घरी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

मुंबई, दि. २० – राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पहाटे ४ वाजता काढून अधिकृतरित्या प्रसिद्ध न करता अधिकाऱ्यांना व्हाट्सअपवर का दिले, असा सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला विचारला.

राज्यात महसूल विभागात २०० बदल्या झाल्या असून त्या खालोखाल वन, कृषी, उत्पादन शुल्क विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असून यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. शासन आपल्या दारी आणि अधिकारी मंत्र्यांच्या घरी हा प्रकार चालू असल्याची टीका दानवे यांनी केली.

वन विभागात झालेल्या बदल्यांबाबत भाजपच्याच ४ आमदारांनी तक्रार केल्यानंतर त्या बदल्या थांबविण्यात आल्या. कृषी विभागाच्या सचिवांनी या बदल्या होऊ शकत नाही, सदर बदलीस ते अधिकारी पात्र नाही, असा शेरा मारला असतानाही पदोन्नती केल्या गेल्या. तर उत्पादन शुल्क विभागात वर्ग ३ व वर्ग ४ चे अधिकार सचिवांकडे असताना मंत्र्यांनी बदल्या केल्या असल्याचा आरोप दानवे यांनी करत बदल्यांवर झालेल्या भ्रष्ट्राचाराबाबत सरकारवर ताशेरे ओढले.

सरकारी बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. जो अधिकारी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देईल, गैरव्यवहार करेल त्याला हवे त्या ठिकाणी पोस्टिंग मिळते व जे मंत्र्यांच्या मनाविरुद्ध काम करेल त्यांना पध्दतशीरपणे बाजूला केले जात असल्याचे दानवे यांनी म्हटले.

Back to top button
error: Content is protected !!