राजकारण
Trending

उद्धव ठाकरेंनी राजीनामा न देता संघर्ष करायला हवा होता या शरद पवारांच्या मतांवर आज सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब ! पवार म्हणाले, नाराज करण्याचा हेतू नव्हता तर ती वस्तूस्थिती होती, आता जोमाने काम करू !!

मुंबई, दि. ११ – शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता संघर्ष करायला हवा होता, असे ठाम मत त्यांच्या व्यक्त केले होते. या मताला कायदेशीर अधिष्ठान असल्याचेच आज सिद्ध झाले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंना बसवता आलं असतं अस स्पष्ट निरीक्षण नोंदवून सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे शरद पवारांच्या मतावर मोहोर उमटवली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे जनक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज कोर्टाच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर खा. शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालातील काही मुद्द्यांमध्ये कोर्टाने साधारणपणे जे राज्यकर्ते आहेत त्यांच्यासंबंधीची तीव्र भूमिका मांडली. या निकालात विधिमंडळ पक्ष मान्य नसून जो राजकीय पक्ष आहे त्याचा आदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. काही निर्णय अद्याप व्हायचे आहेत.

विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेचा विषय सोपवण्यात आला आहे. हा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी सुप्रीम कोर्टाची अपेक्षा आहे. विधानसभा अध्यक्ष त्यांची भूमिका घेतील तेव्हा त्यांच्यासमोर आमचे म्हणणे मांडण्यात येईल, असे पवार म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष हे इन्स्टिट्युशनल पद आहे. या पदाची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांनी या पदाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यायला हवी. अपेक्षा आहे इन्स्टिट्युशनसंबंधी या लोकांमध्ये किती आस्था आहे, हे उद्या त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होईल, असे पवार म्हणाले.

माझ्या पुस्तकात मी याबाबत स्पष्टपणे लिखाण केल्याने आमचे मित्र नाराजही झाले. पण त्यामागे नाराज करण्याचा हेतू नव्हता तर ती वस्तूस्थिती होती. आज सुप्रीम कोर्टाने तीच गोष्ट व्यक्त केली. मात्र झाल्या त्या गोष्टी झाल्या. आता आम्ही, उद्धव ठाकरे, काँग्रेस मिळून जोमाने काम करायला सुरुवात करू, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

Back to top button
error: Content is protected !!