महाराष्ट्र
Trending

महाराष्ट्रात मान्सूनची दस्तक, राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज राज्यातील दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

नैऋत्य मान्सूनचे आज 11 जूनला महाराष्ट्रात आगमन झाले. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटकचा‌ व तामीळनाडू व आंध्रप्रदेशचा‌ काही भाग मान्सूनने व्यापला आहे.

दरम्यान, दिनांक 11 जून रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात तर दिनांक 12 जून रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने व्यक्त केली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसांत कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. मराठवाड्यात दिनांक 09 ते 15 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 16 ते 22 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

Back to top button
error: Content is protected !!